पुणे : पुणे शहारातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील धनाढ्य बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने नशेमध्ये पोर्शे या अलिशान कारने दुचाकीवरील तरुण-तरुणीला उडवले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातावेळी मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या या अल्पवयीन वेदांत अग्रवालचे अनेक कारनामे समोर येत आहे. यासंदर्भात नगर जिल्ह्यातील राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी ट्विट करून धक्कादायक खुसाला केला आहे.
या वेदांत अगरवालमुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती. सोनाली तनपुरे यांनी त्यांच्या मुलासोबतचा शाळेतील एक किस्सा सांगितला आहे. “मी वेदांत अगरवालसह काही मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर मी माझ्या मुलाला शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत शिकवले”, असं सोनाली तनपुरे यांनी सांगितलं आहे.
सोनाली तनपुरे यांनी ट्विट करून बिल्डरच्या प्रतापी मुलाचा भांडाफोड केला आहे. सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. ”कल्याणीनगर येथील कार ॲक्सिडंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता”, असा गंभीर आरोप सोनाली तनपुरे यांनी केला आहे.