पुणे-सरत्या वषार्ला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना चित्रपट्यांच्या गाण्यावर थिरकणारी आणि मद्यधुंद झालेले तरुण-तरुणी दिसतात. परंतु व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता वर्षाअखेरीच्या मधूर संध्येला संकल्प करु, दारु सोडून दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करु… असे म्हणत महाविद्यालयीन तरुणाई आणि पोलिसांनी पुढाकार घेतला. दारु सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत पोलिसांनी देखील दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् न-हे, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक हरिदास चरवड, स्विकृत नगरसेवक गंगाधर भडावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. वर्षाअखेरीच्या मधूर संध्येला व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याकरीता मोठया संख्येने तरुणांनी अभियानात सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा ८ वे वर्ष होते.
भीमराव तापकीर म्हणाले, दारु सोडा, दूध प्या हा संदेश केवळ राज्यात नाही तर देशात जायला हवा. तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाधिन होत आहे. खरे तर कोणतेही व्यसन असता कामा नये. मुलांच्या पालकांनी याकरिता मुलांकडे लक्ष देत जागरुक राहिले पाहिजे. व्यसनाधिन झाल्यावर ते सोडविणे गरजेचे आहेच, मात्र व्यसन लागू नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
शैलेश संखे म्हणाले, जो व्यक्ती व्यसनाधिन होतो, तो स्वत:वरील नियंत्रण गमावतो. नियंत्रण गमावले की गुन्हेगारीकडे वळतो, त्याची बुद्धी देखील भ्रष्ट होते. त्यामुळे वाईट गोष्टी घडतात. याकरीता दारु सोडा, दूध प्या, हे अभियान गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्यावर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम महत्वाचा आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, न-हे, वडगाव बुद्रुक आणि सिंहगड रस्ता अशा तीन ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले आहे. बल, बुद्धी आणि सद््विचारांसाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन आम्ही कार्यरत आहोत. समाज देखील सद््विचारी व्हावा, हा या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. युवक हा र्निव्यसनी असला पाहिजे, तरच भारत देश विश्वगुरु बनण्याकडे वाटचाल करु शकेल, असेही त्यांनी सांगितले.