पुणे-राज्यातील कोरोनाची तिसरी लाट जरी सौम्य असली तरी बाधितांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती. पण, आता राज्यातील काही शहरांमध्ये बधितांची संख्या ही कमी होताना दिसून येत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत, ही दिलासादायक बाब असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. त्यामुळे मास्कमुक्त महाराष्ट्राची चर्चा कालपासून सुरू आहे. याबाबत बोलताना टोपे म्हणाले, अशी कोणतीही चर्चाच झालेली नाही. इंग्लंड व इतर देशामध्ये मास्कमुक्त व निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, याबाबत राज्य व केंद्रीय टास्क फोर्सशी चर्चा करावी, अशी चर्चा झाली आहे. याबाबत अभ्यास करण्यात येणार असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावी, अशी विनंती राज्य सरकारने करावी, अशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या एका नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू असून याबाबत मीही माहिती घेतली आहे. मात्र, याची लागण अद्याप कोणालाही झालेली नाही. कोरोनचा नवा प्रकार हा ओमायक्रॉनसारखाच फैलावणारा असल्याचेही टोपे म्हणाले. नवीन व्हेरीअंट ‘डेडली’ आहे असं मी ऐकलं आहे. त्याचा अभ्यास सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) त्याचा अभ्यास करत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी जी रुग्णसंख्या वाढत होती ती कमी होत आहे. मात्र, काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. पण, या ठिकाणी चिंता करण्याची काहीही कारण नाही. सर्वजण पाच ते सहा दिवसांत बरे होत आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यात तिसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्याचबरोबर ओमिक्रॉनचाही धोका वाढत होता. त्यामुळे राज्यात काही निर्बंध लावण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले होते, परंतु रुग्ण संख्या कमी होत आहे आणि मृत्यूदरही कमी होत आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाने स्थानिक परिस्थीती पाहून गोष्टी सुरु कराव्यात अशी परवानगी दिली होती.
राज्यात बुस्टर डोस द्यायलाही सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मुलांचे लसीकरणही वेगात सुरु आहे. लसीकरणाचा टक्का वाढल्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण रुग्णलयापासून दूर राहत आहेत. रुग्णलयात भरती होणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरचा भार हलका झाला आहे. त्याचबरोबर आता कोरोनाची लस मेडीकल स्टोअर्समध्येही मिळणार आहे. त्यामुळे लसीकरण अधिक वेगात होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. .