जुनी सांगवीतील फ्लॅटधारकांना बांधकाम व्यावसायिक देईना फ्लॅटचा ताबा :बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल होऊन आठ महिन्यानंतरही चार्जशीट दाखलच नाही

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी(प्रतिनिधी)–इमारतीचे बांधकाम पाच वर्षांपासून आजही अपूर्णच आहे आणि प्रत्यक्ष ताबा मिळण्याचा कालावधी संपून ३ / ४ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, जुनी सांगवीतील बांधकाम व्यावसायिकाने अद्याप फ्लॅटचा ताबा न दिल्याने फ्लॅटधारकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू सावळे (शहर उपाध्यक्ष) यांच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करून संबंधित बांधकाम व्यावसायिकावर मोफा अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली. पण गुन्हा दाखल होऊन आठ महिने झाले. तरीही संबंधित बांधकाम व्यावसायिकावर पोलिस कारवाईस टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिव रुपेश पटेकर यांच्यासह अन्यायग्रस्त फ्लॅटधारक उपस्थित होते.

जुनी सांगवीतील निर्माण आंगण, उषा:काल सोसायटीतील सर्वच फ्लॅटधारकांची बांधकाम व्यावसायिक रवींद्र सुधाकर चव्हाण आणि कमलेश चासकर यांनी फसवणूक केली आहे. गेली दोन वर्षे अनेक पत्रव्यवहार करूनही फ्लॅटचा ताबा दिला जात नाही. सर्व सभासदांची नोंदणी 2016-17 मध्येच झाली आहे. नोंदणीनुसार प्रत्यक्ष ताबा मिळण्याच्या तारखेपासून आजपर्यंत ३ ते ४ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. दरम्यानच्या काळात फ्लॅटधारकांनी महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी – चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांची भेट घेऊन सदर प्रकार सावळे यांच्या कानावर घातला तसेच त्यांना याबाबत लेखी तक्रारही दिली. त्यानुसार मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली राजू सावळे यांनी फ्लॅटधारकांना सोबत घेऊन गेल्या दोन वर्षात सांगवी पोलिस ठाण्यात व महापालिकेच्या बांधकाम विभागामध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिक रवींद्र चव्हाणच्या विरोधात कागदपत्रांच्या पुराव्यासह पाठपुरावा केला. त्याला यशही आले.

27 मे 2021 रोजी सदर बांधकाम व्यावसायिकाविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 27 मे 2021 रोजी संबंधित बांधकाम व्यावसायिक रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊनही सांगवी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालत अद्याप चार्जशीटच दाखल केले नाही. एकंदरीत गुन्हेगाराला गेट जामीन करण्यासाठी वेळ दिला गेला. पोलिसांनी वेळीच न्यायालयात चार्जशीट दाखल केले असते, तर सदर बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटधारकांना न्याय मिळून फ्लॅटचा ताबा मिळण्यास मदत झाली असती. पण पोलिसांच्या वेळकाढूपणाचा फटका सर्वसामान्य फ्लॅटधारकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट दाखल करावेत. जेणेकरून आम्हाला आमचे फ्लॅट मिळण्यास मदत होईल.

राजू सावळे यांनी आरोप केला, की जेव्हा जेव्हा अन्यायग्रस्त फ्लॅटधारकांनी सदर बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅटचा ताबा देण्याविषयी फोन केले. त्या त्या वेळी बांधकाम व्यावसायिक रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येकाला वेगवेगळी खोटी कारणे देऊन टाळले आहे सर्व फ्लॅटधारकांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम देऊनही फ्लॅटचा ताबा न देता सततच्या दमदाटीमुळे सर्व फ्लॅटधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फ्लॅटधारक शशीकला माने, संदीप जगताप, सुनील भोजने यांनी सांगितले, की सदर इमारतीमध्ये दोन फ्लॅट हे महिलांच्या नावावर आहेत. त्यांच्याशीही सदर बांधकाम व्यावसायिक कोणत्याही प्रकारचे तारतम्य न बाळगता बोलतात. तसेच आम्ही सर्वजण सध्या भाडेतत्वावर राहत असून, सध्याच्या कोरोना महामारीमध्ये घराचे भाडे व फ्लॅटचे बँकेचे हप्ते थकले आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या सततच्या दमदाटीमुळे आम्हा सर्वांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे सदर बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ कारवाई होऊन आम्हाला आमचे फ्लॅट ताब्यात मिळावेत, अशी आमची मागणी आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *