पुणे—आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहचल्यानंतर पती-पत्नीची एकमेकांना साथ- सोबत असेल तर जीवन सुखकर होते असे म्हणतात. अनेकवेळा दोघांपैकी एक जीवनसाथीने अर्ध्यावरती साथ सोडून या जगाचा निरोप घेतला असेल तर उतार वयात सोबती असावा म्हणून या वयातही लग्न केल्याची अनेक उदाहरणे समाजात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, असे असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आता अशा उतारवयातील जेष्ठ मंडळींमध्ये विभक्त होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे.
वयाच्या अंतरामुळे विचारात पडलेला फरक, नोकरी-धंद्यानिमित्त दूर असल्याने थांबलेला संवाद, लवकर लग्न झाल्याने संसारातून उडालेले मन, सोशल मीडियाचा अति वापर आणि एकमेकांच्या चारित्र्याविषयी वाढलेला संशय अशा कारणांमुळे साठीनंतर घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
वयाच्या पन्नाशीनंतर जीवनातील अनेक इच्छा पूर्ण झालेल्या असतात. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मानसिक सोबतीची गरज असते. आला दिवस चांगला जगण्यासाठी त्यांच्यासोबत असलेला मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. मात्र तो आधारच आता हरपत चालला आहे. ही साथ प्रत्येकाला मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त अवस्था वाढत आहे. मुले मोठी झाली की वृद्ध दाम्पत्यात एकटेपणा येतो. त्यामुळे आता संसारात काही सुख राहिले नाही. असे विचार वाढीस लागतात. कोणत्याही विषयावर एकमत होत नसल्याने त्यांच्यात क्षुल्लक बाबींवरून द्वेष वाढत जातो. मुलांबरोबर देखील भांडणे होतात.
वादाची तीव्रता वाढतच गेल्याने मुलेदेखील आई-वडिलांच्या भांडणात लक्ष द्यायचे कमी करतात. त्यातून दोघांची घुसमट वाढल्याने आणि अनेक वर्षांचा संसार झाल्यानंतरही उर्वरीत आयुष्य सुखी होण्यासाठी वृद्धही घटस्फोटाचा मार्ग निवडत आहेत. आई-वडिलांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर मुलांचे म्हणणे असते की, या वयात घटस्फोट घेऊन करणार काय? त्यावर त्याचे उत्तर असते की, नातेच शिल्लक राहिले नसेल तर एकत्र राहून काय होणार. समाजाला दाखवण्यासाठी नोकरी, लग्न, मुले, संसार झाला. पण पती-पत्नी म्हणून त्यांनी जे जीवन जगायला पाहिजे होते ते जीवन त्यांना प्रत्यक्षात मिळालेच नसते.
घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये…
दाम्पत्यांनी साठीनंतर घटस्फोटासठी अर्ज करू नये. कारण तो आयुष्याचा शेवटचा टप्पा सुरू असतो त्या काळात कोणतेही वाद निर्माण करू नये. स्वत: साठी जगावे. या काळात एकट्याने जगण्यापेक्षा साथीदार असणे कधीही चांगले असते. जरी वाद निर्माण झाले तरी ते मॅरेज कौन्सिलर, मेडीएटर, प्रि-लिटीगेशन सेंटर येथे सांगून तोडगा काढावा. घटस्फोटासाठीची प्रक्रिया किचकट असते. घटस्फोटाचा अर्ज मंजुर होण्यासाठी बराच वेळ लागतो. तरूण जोडप्यांनाही याचा त्रास होतो. तर, ज्येष्ठांना मनस्ताप होणे सहाजिकच आहे. त्यांच्यातील नैराश्य वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे घाईघाईने त्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये. गरज लागल्यास परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज करावा अथवा दोघांनी विभक्त राहावे.
ज्येष्ठांमधील घटस्फोटाची प्रकरणे संपविण्यासाठी प्रत्येक घरातून प्रयत्न व्हायला हवेत. लग्न झाल्यानंतर जोडप्याचे आई-वडिल ज्याप्रमाणे त्यांच्यावर लक्ष ठेवतात. त्याच प्रमाणे आता मुलांनी देखील वडीलधाऱ्यांवर लक्ष ठेवावे. कौटुंबिक विषयावर त्यांच्याशी सतत संवाद साधवा. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील अॅड. गणेश माने यांनी सांगितले.