रामकृष्ण परमहंसांची शिकवण आजही प्रासंगिक

लेख
Spread the love

रामकृष्ण परमहंस म्हणलं की, आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद. ज्या विवेकानंदांनी जागतिक सर्वधर्म परिषदेत आपला सनातन, मूळ भारतीय हिंदू धर्म समजावून सांगितला. हे विश्वाची माझे घर असे आम्ही मानतो, आमच्याकडे संस्कृती, आध्यात्मिकता पुरेपुर आहे, साऱ्या जगास आम्ही सुसंस्कृत करु शकतो, आपणा सर्वांना आम्ही आमचे बांधव मानतो, अशी एकरुपता सर्वांच्या ठायी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. यामागची प्रेरणा कोणाची होती‌, तर रामकृष्ण परमहंस यांची! त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊ, आज असलेल्या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

पूर्वाश्रमीचे गदाधर चट्टोपाध्याय कलकत्त्यातल्या कालीमातेचे पुजारी म्हणून कार्यरत होते. पोटभरू विद्या शिकण्याच्या ते पहिल्यापासूनच विरोधात होते. लौकिक अर्थाने त्यांचं शिक्षण झालं नव्हतं. ईश्वरप्राप्तीसाठी लागणारं शिक्षण त्यांना पाहिजे होतं. ईश्वरप्राप्तीचा त्यांना ध्यास लागला होता. त्यांच्या जीवनाचं वर्णन करायचं असेल तर त्याग, सेवा आणि साधना असं करावं लागेल. त्यांनी भाषणबाजी करणं, थोड्या ज्ञानाच्या आधारावर खूप काही सांगणं असे प्रकार न करता प्रयोग व समन्वय यावर भर दिला. कोणत्याही गोष्टीतली तथ्यता स्वतः kiआजमावून पाहिली.
जन्माला येणाऱ्यानं हे लक्षात ठेवावं की, काम करणाऱ्या माणसाचं लक्ष जसं पूर्णपणे घराकडे असतं तसं त्यानं जगात रहावं. ईश्वरानं काही कारणास्तव आपल्याला इथं पाठवलं आहे. काम झाल्यावर आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा नेहमी आपल्या मूळ घराचं स्मरण असावं.
निराकार, साकार प्रार्थना करता येते, मूर्तीपूजेची गरज नाही. परंतु निराकारावर मन एकाग्र करता येत नाही. म्हणून साकारावर मन एकाग्र करावं. मग ते साकार रुप कोणतंही असो. आपल्याला आवडेल, विश्वास बसेल त्या रुपावर भक्ती करावी. एकदा मन एकाग्र झालं, आपला विश्वास दृढ झाला की साकाराची गरज नाही. देव सर्वत्र, चराचरात भरलेला आहे परंतु, प्रत्येकाच्या हृदयात त्याचं खास स्थान आहे. तो हृदयातला देव जागवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ही गोष्ट अखिल मानवजातीसाठी लागू आहे.
रामकृष्णांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला होता. इस्लाम, ख्रिश्चन धर्माचे सखोल ज्ञान त्यांनी त्या-त्या गुरुकडून जाणून घेतलं होतं. स्वानुभावावरुन त्यांनी असा निष्कर्ष काढला की, साऱ्या चराचरात एकच देव आहे. आपल्या आवडीनुसार त्याची रुपं बदललेली आहेत. कोणत्याही रुपात नामस्मरण केले तरी ते एकाच निराकारापर्यंत पोहचते.
अखिल मानवजातीला एकाच सूत्रात बांधणारा हा सर्वश्रेष्ठ महंत होता. भारतासाठी आवश्यक असणारा राष्ट्रधर्म जागवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अहंकार हाच या मार्गातील मोठा अडसर आहे, तो दूर केला की खरेपणाचं दर्शन होतं. तपस्या, सत्संग आणि स्वाध्याय यातून अहंकार दूर व्हायला मदत होते. मीठापासून केलेली मूर्ती सागरास अर्पण करावी, इतकं ते सोपं आहे. ज्याच्यापासून उत्पत्ती तिथंच लय एवढं लक्षात ठेवा.समाजात वावरताना सर्वांच्या भावनांचा विचार करावा, आपल्या वागण्यात शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, किंवा मधुर भाव ठेवावा. यापैकी आवडेल त्या भावानं सर्वांकडे पहावं. दास्य भावाने सेवा करावी, सख्य भावानं भावंड मानावीत. परमहंसानी तर आपल्या पत्नी शारदा यांना देवी मानले, माता मानले.
आजच्या आपल्या भारताला याच संदेशाची गरज आहे. भाषिक, वांशिक, धार्मिक वाद वाढवण्यापेक्षा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. भारताच्या संविधानात सांगितलेल्या सर्वधर्मसमभावाचा असा अर्थ घेतला पाहिजे.
अशा या थोर रामकृष्ण परमहंस यांचं त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करूया आणि हृदयातल्या चैतन्यमयी ईश्वराला जाणून घेऊ!

– गीताग्रजा (डॉ वैशाली काळे-गलांडे)

मोबाईल नंबर – 9420456918

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *