पुणे—पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या वतीने करण्यात आलेल्या ‘सिरो सर्व्हे’ मध्ये पुण्यातील ५१ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँँटिबॉडी तयार झाल्याची आनंदाची बातमीबरोबरच पुणेकरांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्त अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण गेल्या दहा दिवसात २७ टक्क्यावरून १९ टक्कयांपर्यंत खाली आले आहे.
पुण्यातील ७ ऑगस्ट रोजी कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण २७ टक्के होते ते १७ ऑगस्ट रोजी १९ टक्कयांपर्यंत खाली आले. म्हणजेच पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची टक्केवारी दहा दिवसांमध्ये ८ टक्क्यांनी घटली आहे.
पणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यामध्ये आहे. मात्र, गेल्या काही दिवसात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसते आहे.
पुणे शहरात दररोज १००० ते १५०० एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, कमी मृत्यूदर आणि सक्रिय रुग्णांची कमी होत असलेली संख्या नागरिक आणि प्रशासनासाठी दिलासा देणारी ठरत आहे. पुणे महानगरपालिका आणि पुणे स्मार्ट सिटीकडून जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १७,०३३ इतकी होती. १७ ऑगस्ट रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १४,४४२ इतकी आहे. सक्रिय रुग्णांची कमी होत असलेली संख्या काहीशी दिलासादायक ठरत आहे. त्याचप्रमाणे, गंभीर रुग्णांची संख्याही काही प्रमाणात कमी होत असून पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
नुकत्याच हाती आलेल्या सिरो सर्वेक्षणानुसार, ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. म्हणजेच, ५१ टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आणि कळलेही नाही. म्हणजेच लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.