पुणे—लाखों पुणेकरांच्या बहुप्रतिक्षीत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन शुक्रवारी पार पडली. पुणे मेट्रोला उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला .पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’ मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहचले आहे असे पवार यावेळी म्हणाले. मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिदधार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे उपस्थित होते.
अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचे जलद व वेळेवर पोहचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करणारी ट्रायल रन ठरणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, पुणेकरांना निर्धारीत वेळेत इच्छित ठिकाणी पोहचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेंचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. 60 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने,विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
अजित पवार पुढे म्हणाले, पुणे मेट्रोची, सगळ्या मार्गांची कामे पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदुषणाचा ताणकमी होईल. वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारीत वेळेत पोहचू शकतील, दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील, असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदुषणविरहीत सेवा असल्याने प्रदुषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहने कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदुषणही कमी होईल. पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोड करण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहाराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पूलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोच एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झालं आहे. पुणे मेट्रोनं उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.