पुणे(प्रतिनिधि)—पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचाराची सांगता होण्यासाठी आठवडा बाकी आहे. महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एमआयएमचे अनिस सुंडके हे रिंगणात उतरले आहेत. चारही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. मात्र, लोकसभेची खरी लढत ही महायूतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या पाठोपाठ कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या जाहीर सभांनंतर पुणे लोकसभेच्या लढतीत ट्विस्ट आला आहे. पुणे लोकसची लढत ही आता मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी न होता ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला पुण्यातील रेसकोर्स मैदानावर भव्य सभा झाली तर या सभेला काउंटर करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीने कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा घेतली. 3 मे रोजी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर ही सभा झाली.
या दोन प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्यानंतर उमेदवारांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चा आता मागे पडल्या आहेत. नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलेले राष्ट्रीय मुद्दे, पुण्याच्या संदर्भात केलेल्या गेल्या दहा वर्षांत झालेली विकासाची कामे आणि भविष्यातील विकासाचे व्हीजन आणि राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात केलेल्या मुद्यांची चर्चा सध्या होताना दिसते आहे. पुण्यातील दोन उमेदवारांच्या तुलनेपेक्षा ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील तुलना करूनच मतदान करण्याचा सूर उमटताना दिसत आहे. आपसुकच गेल्या काही दिवसांपासून मोहोळ विरुद्ध धंगेकर या लढतीला आता नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे स्वरूप आले आहे.