पुणे-शेतकऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करून आंदोलन चिरडले जात आहे. आपण अस्वस्थ झाले पाहिजे, असा काळ आहे. केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे अशी टीका करत आपण लोकशाहीत आहोत का? असा सवाल महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे स्वातंत्र्य सैनिक अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. थोरात यांच्या हस्ते आरोग्य मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि कृषी अभ्यासक विलास शिंदे यांना ‘रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी होते.
‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे प्रकार पाहून अण्णासाहेब आणि रावसाहेब शिंदे प्रचंड अस्वस्थ झाले असते. दिल्लीतील स्थिती पाहून आपण अस्वस्थ होण्याचा काळ आहे,’ असे थोरात यांनी सांगितले. गुजराथी म्हणाले, ‘जगात काही देशांनी अणू दिला, चीनने विषाणू दिला तर भारताने लसरूपी सहिष्णू वृत्ती दिली आहे. साथीच्या आजाराची तीव्रता पाहता अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर आठ टक्के तरतूद आवश्यक आहे.’ सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे यांनी आभार मानले.