पुणे- राज्यासमोर कोरोनासारख्या महामारीचा मोठे संकट,मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण यांसारखे प्रश्न असताना भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सगळ्यांचे लक्ष यावेळेला फक्त कोरोनाकडे असायला हवे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
पुण्यातील विधान भवन येथे पुणे जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी झालेल्या त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी व्हावी, असा निर्णय करण्यात आला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
कोणीही काहीही मागणी केली तर लगेच उद्या कारवाई होईल असे नाही, पण राज्यात सीबीआयला चौकशीला यायचे असेल तर राज्यसरकारची पूर्वपरवानगी लागते. ही बाब देखील लक्षात राहिली पाहिजे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर आज (शुक्रवारी) ईडीने छापामारी केली. यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा त्यांचा तपास करत आहेत. हे प्रकरण सबज्युडीस आहे म्हणून यावर मी बोलणं उचित होणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी दिली. अनिल देशमुख यांच्यावर परबीरसिंह आणि वाझे यांनी केलेल्या आरोप प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सवलती दिल्यानंतर पॉझिटिव्ह रेट कमी झाला. मात्र सध्या सुरु असलेले निर्बंध कायम राहतील, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शाळा आणि कॉलेज संदर्भात 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. लसीकरणाला गती मिळाली आहे, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तिसरी लाट ही चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी. बाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये, तिसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त बाधित होऊ शकतील असा अंदाज आहे, असं मत वळसे पाटलांनी व्यक्त केलं.
जास्तीत जास्त मेडिकल सुविधा द्यायचा विचार करत आहोत. लसीकरण वाढवलं पाहिजे. सुपर स्प्रेडर लोकांचा अटकाव करावा लागेल. केंद्र सरकार याबाबत मार्गदर्शन करत आहे. लग्नात वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. कारण तेथून प्रसार अधिक होऊ शकतो. पोलिसांना याबाबत सूचना दिल्या आहेत, मिटिंग घ्यायला सांगितले आहे, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली.