तेजोनिधी स्वामी विवेकानंद


आपल्या मूळ परंपरा, संस्कृती आणि धर्म यांपासून दूर गेलेला समाज; कालांतराने स्वतः ची राष्ट्र म्हणून असणारी खरी ओळख विसरू लागतो. भरकटलेल्या समाजाचे, राष्ट्राचे होणारे पतन थांबण्यासाठी, विवेकाची शिकवण देण्याची आवश्यकता भासते.

१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात, “आपले राष्ट्र हेच प्रेम आणि राष्ट्राचे होणारे पतन हीच चिंता” अशी भावना मनात जपत; आपल्या राष्ट्राचे आचार्यत्व स्वीकारलेले एक नांव म्हणजेच “स्वामी विवेकानंद”.

१२ जानेवारी १८६३  हा स्वामीजींचा जन्मदिवस, त्याच निमित्ताने त्यांची शिकवण, चरित्र यांचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.

स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला त्यावेळची समाजस्थिती वर सांगितल्याप्रमाणेच होती. भारतावर निष्कंटक राज्य करता यावे यासाठी इंग्रजांनी भारतीय शिक्षणव्यवस्था, स्वदेशी व्यवसाय  आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती उद्ध्वस्त करून टाकली होती. जे जे भारतीय ते ते विकृत, निकृष्ट दर्जाचे अशी भारतीयांची मानसिकता निर्माण करण्यात आली होती.

एकीकडे आधुनिकतेच्या नावाखाली शास्त्रे आणि कायद्याच्या नावाखाली शस्त्रे गमावलेला समाज हा सत्वहीन, तत्वहीन, धर्महीन आणि मुख्य म्हणजे पराक्रमशून्य झाल्याशिवाय राहील काय?

अश्या या आत्मविस्मृत समाजाला स्वामी विवेकानंदांनी, रडणे थांबवून मन आणि मनगट पोलादी करण्याचा संदेश दिला. आपले राष्ट्र आणि आपला धर्म यांच्या रक्षणासाठी सिंह होण्याचा संदेश दिला.

अधिक वाचा  प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी- मुरलीधर मोहोळ

हिंदूंना केवळ पोथीबाज, भजन-संध्येत मश्गुल होऊन निष्क्रियता वाढवणारी काथ्याकूट करण्याची शिकवण देणारे तत्वज्ञान स्वामीजींना कधीच मान्य नव्हते; म्हणूनच त्यांनी सांगितलेला धर्म हा पौरुषाकडे, पराक्रमाकडे, प्रयत्नवादाकडे घेऊन जाणारा आहे.

कधी कधी स्वामीजींचे संदेश हे एखाद्या बंडखोर नेत्याचे विचार वाटतात परंतु वाचकांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की; स्वामीजींनी दिलेला संदेश हा काही उथळ विचारांतून किंवा वाचाळवीरतेतून दिलेला नव्हता तर, तो संदेश उपनिषदांच्या अध्ययनातून प्रकट झालेला होता.

स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थाने परिव्राजक संन्यासी होते पण तरीही त्यांचा स्वभाव, शिकवण हे वीररसाने भरलेली होती. म्हणूनच, त्यांना योद्धा-संन्यासी असे संबोधले जाते.

स्वामीजींनी अध्यात्मशास्त्र सांगताना वेदांताचा आधार घेतला आहे, स्वामीजींनी मांडलेला वेदांत किंवा अध्यात्म हे विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे होते. त्यामुळे अणुविज्ञानात झालेले आधुनिक संशोधन हे स्वामीजींच्या विचारांचे समर्थन करताना दिसतात.

साधारणपणे ५ वर्षे (१८८८ ते १८९३) देशाटन केल्यानंतर स्वामीजींच्या असे लक्षात आले की; जे पाश्चिमात्य देश स्वतःच्या धर्माचा प्रसार करून भारतीय जनतेला भुरळ पाडतात; अशाच देशांना आपल्या धर्माची महती मान्य करायला लावणे हे आवश्यकच आहे आणि म्हणूनच त्यांनी अमेरिकेमध्ये होणाऱ्या सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून जाण्याचे ठरवले.

अमेरिकेत शिकागो येथे हिंदूधर्मध्वजा अभिमानाने फडकविल्यानंतर सुमारे ४ वर्षे इंग्लंड, अमेरिकेसह, युरोपियन देशातून असंख्य व्याख्याने देत स्वामीजींनी हिंदू धर्माचे तत्वज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे हे ठणकावून सांगितले.

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-5)

हिंदू तत्वज्ञान किंवा हिंदुत्व यांना कःपदार्थ मानून पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करणाऱ्या तरुणाईने स्वामीजींची परदेशातील व्याख्याने, भाषणे यांचा अवश्य अभ्यास करावा. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे हिंदूधर्म हीच सर्व धर्मांची जननी असून, भारतीय संन्यासी, ऋषी-मुनी हेच खरे आणि आदी तत्वज्ञ आहेत.

विदेशातच रमू पाहणाऱ्या तरुणाईने आणखी एक बाब लक्षात घ्यावी की; स्वामीजींनी ठरवले असते तर ते कायमस्वरूपी विदेशात राहून अपार धन कमवू शकले असते. एखाद्या तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूला शोभेल इतके पांडित्य असूनही, स्वामीजी अखेर भारतातच परत आले.

परदेशात असताना, आपल्या मातृभूमीबद्दल सांगताना स्वामीजी म्हणतात की, “मी इथे आलो त्यावेळी माझ्या मातृभूमीवर माझे अतिशय प्रेम होते. आता तर मायभूमीतील कण न् कण मला अतिशय पवित्र झाला आहे. माझ्यासाठी भारतभूमी म्हणजे पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे.”

स्वामीजींनी जसा अध्यात्मयोग साऱ्या जगाला सांगितला तसा आपल्या देशबांधवांना कर्मयोगही सांगितला, आपल्या देशातील अज्ञजन, शोषित, पीडित, वंचित समाजबांधवांची निःसंकोच सेवा करण्याचा संदेशही दिला.

“शिवभावनेतून जीवसेवा” हे सूत्र सांगत असतांनाच आपल्या पतित बांधवाना स्वाभिमानही शिकवला. त्यांच्यातील चैतन्य, कार्यशक्ती जागृत करताना स्वामीजी म्हणतात, “तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात; अमृताचे अधिकारी आहात. तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वतः ला मेषतुल्य का समजता? उठा मृगराजांनो, उठा, आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त  आणि नित्यानंदस्वरूप आत्मा आहात.”

अधिक वाचा  दिव्यदुर्गा : जागर दिव्यदुर्गांचा : जिद्दी मेधाताई

स्वामीजींचे एकंदरीत चिंतन हे अध्यात्माच्या चौकटीतले वाटत असले तरी त्याला, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मिती हे देखील कंगोरे आहेत. स्वामीजींच्या मते राष्ट्रोधारासाठी आवश्यक बाबी या अध्यात्माच्या सोबत राहूनच योग्यरितीने अवलंबल्या जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचे शिक्षण, आधुनिकता, विज्ञानवाद, तंत्रज्ञान, व्यावसायिक आत्मनिर्भरता, राष्ट्रवाद, समाजवाद या साऱ्याचे चिंतन हे अध्यात्माच्याच मार्गाने गेलेले दिसते.

सर्वसमावेशक किंवा सर्वधर्मसमभाव जपण्याकरता, स्वधर्म वाईट ठरवणे आवश्यक नसते; हेच स्वामीजींच्या तत्वज्ञानाचे सार आहे.

स्वामीजींसारखे दीपस्तंभ ज्या भूमीत होऊन गेले ती भूमी निश्चितच विश्वगुरू असली पाहिजे यात शंकाच नाही.

परंतु, आजही काही भारतीयांना विदेशी संस्कृती आणि परंपरा यांचेच अंध-आकर्षण वाटते आहे. ३१ डिसेंबरच्या पार्ट्या, व्हॅलेंटाईन डे सह अनेक डे, क्रूज वरच्या ड्रग्स पार्ट्या या कशाचे प्रतीक आहेत?  एकंदरीत बिघडत असणारी समाजस्थिती पाहता प्रश्न पडतो की; भारतभूमीचा कण न् कण पवित्र वाटणाऱ्या स्वामी विवेकानंदांना आम्ही केवळ पूजनाकरताच स्मरणार का?

संकलन-शब्दांकन : श्रीपाद श्रीकांत रामदासी.

संपर्क : +९१९६१९४९०५३४

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love