Technical analysis of 19 thousand audio clips in Sharad Mohol murder case

साथीदारांनीच केला गुंड शरद मोहोळचा गेम : आठ जणांना अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा त्याच्याच साथीदारांनी गेम केल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा परिसरात दिवसाढवळ्या शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात मोहोळवर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवून पळून जाणाऱ्या आठ जणांना जेरबंद केले आहे.(Friends played the game of gangster Sharad Mohol)

शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास शरद मोहोळ आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून त्याच्या सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले,  नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार त्याचे बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले.  पण आपले बॉडीगार्डच आपला थोड्याच वेळात शेवट करणार आहेत याची शरद मोहोळला पुसटशी देखील कल्पना नव्हती.

शरद मोहोळ घरापासून  काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली.  तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या,  एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला. 

त्यानंतर गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळाले.  त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्सव्हीयु गाडी घेऊन हजर होते.  पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून या आठ जणांनी सातारच्या दिशेने वाहनातून पळायच ठरवल होतं.  मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ पाठलाग करून आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टोळीत काम करत होते.  यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता.

वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नाराज होते.  विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती तर साहील पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतुन वाद झाले होते. त्यातुन त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलात आणली. या मारेकऱ्यांना शरद मोहोळची हत्या करण्यासाठी त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी विरोधी टोळीने पेरलं होतं का याचाही तपास पोलीस करणार आहेत.  गुन्हेगारी विश्वातून पुण्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सत्तेचे सुरक्षाकवच लाभेल असा शरद मोहोळचा होरा होता.  पण स्वतःच्या बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या साथीदारांच्या मनात काय चाललंय हे शरद मोहोळ ओळखू शकला नाही.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *