Take immediate action on pubs in residential areas, clubs on roof turf and bars in the vicinity of educational institutions, religious places

निवासी भागातील पब, रुफ टर्फवरील क्लब आणि शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळांच्या परिसरातील बारवर तातडीने कारवाई करा : भाजप शिष्टमंडळाची मागणी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -शहरातील निवासी भागांमधील पब, रूफ टर्फ वरील क्लब आणि शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळांच्या परिसरात चालणाऱ्या बारवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली.

शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,  प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, ऍड. वर्षा डहाळे, राजू शिळीमकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. अमली पदार्थांचा  वापर व व्यापार देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याची गंभीर चर्चा सर्वत्र सुरू आहे. या सर्वांची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली.

कल्याणीनगर परिसरात रविवार, १९ मे २०२४ रोजी पहाटे भरधाव लक्झरी कारने चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येतो आहे. या प्रकरणातील तपासामध्ये रोज नव्या अपडेट्स समोर येत आहेत. माध्यमांमधून त्या संदर्भातील माहिती पुढे येते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुण्यामध्ये येऊन आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला होता. तसेच आवश्यक ते निर्देश दिले होते.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण घडून आता १२ दिवस उलटले आहेत. या प्रकरणामुळे पुणे शहराची बदनामी होते आहे. पुणे शहर म्हणजे पब-बारचे शहर असे पसरविले जाते आहे. वास्तविक, सामान्य पुणेकरांचा या सगळ्याशी काही संबंध नाही. पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. शिक्षणाच्या निमित्ताने लाखो लोक  राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांतून पुण्यात येतात. या प्रकरणामुळे पुण्याची प्रतिमा मलिन होते आहे. त्याचा दूरगामी परिणाम पुण्यावर होईल. त्यामुळे आपण लवकरात लवकर तपास पूर्ण करून या प्रकरणी आरोप असलेल्या विरोधात आरोपपत्र दाखल करावे, जेणेकरून न्यायालयात सुनावणी सुरू होऊन आरोपींवरील आरोप सिद्ध होऊन त्यांना कठोर शिक्षा देणे शक्य होईल. पुणे शहर सुरक्षित राहण्यासाठी काम करणे, ही पुणे पोलिसांची जबाबदारी आहे, त्यामुळेच आपण कल्याणीनगर प्रकरणात पुढील तपास लवकरात लवकर पूर्ण केला पाहिजे आणि या प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे, अशा सर्व आरोपींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *