पुणे–पुण्यात स्पर्धा परीक्षेचा (एमपीएसी) अभ्यास करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
अमर रामचंद्र मोहिते (33, रा. नवी पेठ, विठ्ठल मंदिराच्या मागे. मुळ गाव – तासगाव, सांगली) याने आत्महत्या केली आहे. अमर यांचे भाऊ दत्तात्रय रामचंद्र मोहिते हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील भोसरी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय मोहिते यांना भाऊ अमर बाबत काही तरी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका मित्राला आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात माहिती दिली. विश्रामबाग पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, अमरने खोलीचे दार बंद केले होते.
दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तो झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्यानंतर रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) कुंडलिक कायगुडे यांनी आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र, कौटुंबिक कारणामुळं अमर मोहितेनं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.