पुणे: राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षा, आत्मनिर्भर भारत, महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचा विकास आणि महिलाशक्ती सक्षम झाली आहे. देशातील कष्टकरी महिला राष्ट्रनिर्माणाची भूमिका बजावतात, त्यांच्या सन्मानार्थ मोदी सरकारने महिलांसाठी विविध योजना आणल्या असल्याचे मत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शायना एन. सी. बोलत होत्या. भाजपचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर, माजी नगरसेवक दत्ता खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, आरपीआयचे शैलेंद्र चव्हाण, रासपचे संजय आल्हाट, युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, भाजप प्रदेश सचिव युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, सहप्रसिध्दी प्रमुख पुष्कर तुळजापुरकर आदी उपस्थित होते.
शायना एन. सी. म्हणाल्या, देशातील महिलांसाठी राबविलेल्या वेगवेगळ्या धोरणांमुळे महिला केवळ, क्रीडा उद्योग आणि राजकारणातच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेमध्येही योगदान देत आहेत. एनडीए सरकारच्या काळात देशातील महिला शक्ती राफेल विमान उडवत आहे. मोदी सरकारने केंद्रीय राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 33 टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.
एनडीए सरकारच्या काळात स्टार्ट अप इंडिया योजनेअंतर्गत देशातील 5 बिगर शेती व्यावसायापैकी 1 व्यवसाय महिला चालवत आहे. राज्यातील 20 हजार उद्योजकांना 14 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. 1 कोटी आदिवासी महिला अन्न सुरक्षा गटाच्या सदस्य झाल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आणि योजनांचे फायदे यामुळे ग्रामिण भागातील महिलांची प्रगती झाली असल्याचे शायना एन. सी. म्हणाल्या.
इंडि आघाडीचे पक्ष मतदारांना खुष करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या घोषणा करत आहे. देशातील जनतेच्या मालमत्तेवर 55 टक्के वारसा कर लादुन आई-वडील यांची आयुष्यभर साठवलेली संपत्ती आता काँग्रेस काढून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे असेही त्या म्हणाल्या.
बारामतीमधील अनेक गावे दुष्काळाच्या समस्येमध्ये आहेत. सुुप्रिया सुळे यांना बारामतीच्या महिलांना सक्षम करु शकल्या नाहीत. शरद पवार यांच्या मते सुन ही कुटूंबातील सदस्य नाही. गंमत अशी आहे की पवार यांना इटालियन सुनेशी युती करण्यास तयार आहेत पण पवार कुटूंबाची सुन सुनेत्रा पवार यांना कुटूंबातील सदस्य म्हणून स्विकारु शकत नाहीत. अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला आहे.संपुर्ण राज्याच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे शायना एन. सी. म्हणाल्या.