पुणे- पूर्वी विद्यार्थ्यांना दर्जेदार व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीन विकास करणारे शिक्षण घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांची वाट धरावी लागत असे. परंतू आता, भारतातील शैक्षणिक क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बहरत आहे. काहीवर्षांपूर्वी भारतात केवळ ४५८ अँक्टिव्ह नाविण्यपूर्ण स्टार्टअप्स होती, त्यांची संख्या आता दीड लाखांच्या पार गेली आहे. विशेष म्हणजे यातील ९० स्टार्टअप्स ही युवकांच्या पुढाकारातून आलेली आहेत. त्यामुळे, भारतासमोरील बेरोजगारीची समस्या सोडवायची असल्यास विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सकडे वळायला हवे, असे मत भारताच्या एरोनॉटीकल सोसायटीचे अध्यक्ष तथा रक्षा मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार डॉ.जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ९व्या दीक्षारंभा-१४ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी, व्यासपीठावर, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) सेक्रेटरी प्रा.राजीव कुमार, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.अनंत चक्रदेव, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ. विरेंद्र शेटे, डॉ..नचिकेत ठाकूर, डॉ.विपुल दलाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.रेड्डी पुढे बोलताना म्हणाले, डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. कारण, त्यातून येणारे अपयश देखील ऐतिहासिक असते. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या १३०+ एकरांच्या सुसज्ज अशा या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रिया, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर यांसारखे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात, व त्यातून सध्या ७५ संशोधन पकल्प चालू असल्याचे पाहून आनंद झाला, असेही मत यावेळी मांडले.
प्रा.राजीव कुमार यांनी यावेळी बोलताना, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या उपक्रमांचे कौतुक करताना ‘एआयसीटीई’च्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.पुजेरी यांनी तर आभार डाॅ.चक्रदेव यांनी मानले. तर सुत्रसंचलन श्रद्धा वाघटकर व स्वप्नील शिरसाठ यांनी केले.
विश्वाला ‘शांती’कडे नेण्याचे भारतात सामर्थ्य
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना विश्वधर्मी प्रा.डॉ.कराड यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले, विद्यार्थी दशेत सकाळी गाई-गुरं चारायला घेवून घराबाहेर पडल्यानंतर माझी शाळा सुरु व्हायची व त्यांच्यासह आम्ही शाळेतून माघारी परतायचो. गुरांच्या गळ्यातील घंटा हीच आमच्यासाठी शाळेची घंटा होती. तेव्हाच, शहरात जावून मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होतं. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी नक्कीच मोठी स्वप्न पाहावीत, कारण ती एक दिवस नक्कीच पूर्ण होतात. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन आल्यानंतर मला समजले की, संपूर्ण विश्वाचे लक्ष सध्या भारताकडे आहे. कारण, सध्या अशांतता, युद्धाचे सावट, उठाव यांच्यात गुरफटलेल्या विश्वाला सुख, शांती आणि समाधानाचा राजमार्ग दाखविण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे, असेही ते म्हणाले.
नवउद्योजक घडवणारे शिक्षण देण्याची जबाबदारी आता विद्यापीठांची- डॉ. मंगेश कराड
देशातील युवकांच्या वाढलेल्या बेरोजगारीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे होणारे परिणाम नुकतेच बांगलादेशमध्ये आपण पाहिले. लोकसंख्येमुळे भविष्यात आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नव्या स्टार्टअप्सवर भर द्यायला हवा. त्यामुळे, नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारी कौशल्य व नवउद्योजक घडवणारे शिक्षण देण्याची जबाबदारी आता विद्यापीठांची आहे. अगदी तसेच अभिप्रेत शिक्षण एमआयटी एडीटी विद्यापीठ पुरवित असल्याचा अभिमान आहे, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू, प्रा. डॉ.मंगेश कराड यांनी व्यक्त केले