पुणे(प्रतिनिधी)-पंतप्रधान शिवाजीनगर-स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गिकेसह एकूण बारा प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे. यामध्ये स्वारगेट-कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गिकेचे व पुणे महापालिकेच्या भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन होणार असून, एस. पी. कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभाही होणार आहे. मात्र, पुण्याला दोन दिवस रेड ऍलर्टचा इशारा असल्याने पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर पावसाचे सावट दिसत आहे.
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय मेट्रो स्थानक येथे मोदी मेट्रोला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यानंतर शिवाजीनगर स्थानकापासून स्वारगेट स्थानकापर्यंत ते मेट्रोने प्रवास करणार आहेत. स्वारगेट येथे विस्तारीत मेट्रो मार्गिकेचे भूमिपूजन होणार असून, त्यानंतर मोदी यांची सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होणार आहे. मोदी यांच्या या दौऱयाची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या 8 हजार 671 कोटींच्या पाच प्रकल्पांचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होईल. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर ट्रक चालकांसाठी अद्यायवत विश्रामगृह, फास्ट इ व्हेईकल चार्जिंग स्थानक यांचा समावेश आहे. तसेच सोलापूर येथील विमानतळाचेही उद्घाटन केले जाणार आहे. नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशनअंतर्गत तीन ‘परम रुद्र सुपर सुपर कॉम्प्युटर’ विकसि करण्यात आले आहेत. त्याचेही लोकार्पण यावेळी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हवामान आणि वातावरण बदलाचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग यंत्रणा’ तयार करण्यात आली आहे. त्याचेही उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. छत्रपती संभाजीनगर येथे बिडकीन औद्योगिक वसाहत विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये देशभरातून हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्याचेही उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल.
दौऱ्यावर पावसाचे सावट
पुणे जिल्हय़ाला हवामान विभागाकडून दोन दिवस रेड ऍलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी परतीच्या पावसाने पुण्याला जबर तडाखा दिला. पुण्याच्या मध्य भागात 124 मिमी, तर पिंपरी चिंचवड शहरात 127 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने पुण्यातील रस्ते जलमय झाले. सखल भागांत पाणी साचले. अनेक रस्त्यांवर पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. त्यामुळे वाहतुकीच्या प्रचंड कोंडीचा सामना शहरवासियांना करावा लागला आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱयावर असून, त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर जाहीर सभाही होत आहे. मात्र, त्यावर पावसाचे सावट दिसत आहे. पावसामुळे एस. पी.च्या मैदानावर चिखलसद़ृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मैदानाची पाहणी केली. आता पावसाची स्थिती कशी राहणार व त्यात मोदींची सभा होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.