भक्ती-शक्तीचे सामर्थ्य : समर्थ रामदास


हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे स्थान अलौकिक आणि एकमेवाद्वितीय असेच आहे.

काही संशोधकांच्या मते, महाराष्ट्राचा इतिहास हाच हिंदुस्थानचा इतिहास आहे. ही अलौकिकता, हा सन्मान ज्या काही विभूतींमुळे प्राप्त झाला त्यांची यादीच करायची झाली तरी ती भली मोठी होईल. त्यातील एक महनीय विभूती म्हणजेच, सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी. आज माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी ही त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न.

साधारणपणे १३ शतकाच्या उत्तरार्धात यावनी जुलुमांनी महाराष्ट्रासह अवघा हिंदुस्थान जर्जर झाला होता, यावनी जुलूम आणि मनुष्यनिर्मित भेदा-भेदामुळे महाराष्ट्रीय समाज होरपळून निघत असताना, संतमंडळींनी भागवत धर्माच्या पताकेच्या छायेत भक्तिमार्गाचा उत्सव सुरु केला.

भक्तिमार्गाच्या माध्यमातून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमत होती आणि त्याच बरोबर अगदी नकळत समाजाचे संघटन देखील होत होते.

अशा पार्श्ववभूमीवर भक्तिमार्गाला शक्तिमार्गाची जोड देणारे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांचा उदय होणे ही बाब कालसापेक्ष होती असेच म्हणावे लागेल.

भगवंताच्या प्राप्तीसाठी वयाच्या १२ व्या वर्षी घराबाहेर पडलेल्या समर्थांनी, १२ वर्षे गोदावरी काठी टाकळी येथे साधना केली आणि मग पुढे १२ वर्षे देशाटन केले. याच २४ वर्षांच्या कालखंडात त्यांच्या कार्याची बीजे रोवली गेली असे म्हणता येईल. १२ वर्षाच्या देशाटनामुळे त्यांच्या कार्याची दिशा आणि लक्ष्य हे दोन्हीही निश्चित झाले. अवघा हिंदुस्थान फिरत असताना, देशस्थिती, लोकस्थिती आणि मुख्य म्हणजे धर्मस्थिती यांचे निरीक्षण समर्थांनी केले होते.

एकप्रकारे अल्पसंख्यांक असूनही केवळ परस्पर ऐक्य आणि आक्रमकता यामुळे प्रबळ झालेला यावनी समाज तर दुसरीकडे बहुसंख्यांक असूनही एकमेकांतच कलगीतुरा असणारा हिंदू समाज समर्थांनी पाहिला होता, अनुभवला होता.

अधिक वाचा  हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

धर्माची होणारी विटंबना, देशाचा होणारा सांस्कृतिक आणि आर्थिक ह्रास हे सगळे थांबवायचे असेल तर  एक सशक्त, अनुशासनप्रिय आणि मुख्य म्हणजे देव-देश-धर्म  यांचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या समाजाची निंर्मिती करणे, समाजात जागृती आणणे अत्यावश्यक आहे हे समर्थांनी जाणले. त्यांना असे जाणवले की; सद्य स्थितीमध्ये समाजापुढे भक्तिमार्गाबरोबरच शक्तिमार्गाचा आदर्श ठेवणे आवश्यक आहे.

चारित्र्याच्या बाबतीत मर्यादा पुरुषोत्तम असणारा श्रीराम, कुटुंबीयांच्या हट्टासाठी वनवास भोगलेला कुटुंबवत्सल श्रीराम, पितृवचनांकित पुत्रोत्तम श्रीराम, दैत्य दुर्जनांचा नाश करणारा कोदंडधारी श्रीराम, प्रजावत्सल कल्याणकारी राजा असणारा श्रीराम हाच युवकांना, प्रौढांना आदर्श ठरतो.

समाजाला केवळ आदर्श राजा सांगून पुरेसे नव्हते, समाजामध्ये स्वामी निष्ठा, बृहत पराक्रम करण्याची आकांक्षा, बुद्धीचातुर्य आणि मुख्य म्हणजे बलोपासना करण्याची आवड निर्माण करणे हे देखील आवश्यकच होते.

त्यामुळे गुणांचा आदर्श श्रीरामांचा तर कृतीचा आदर्श हनुमंताचा हेच सूत्र तरुणाईपुढे ठेवून त्यांना धर्मभक्तीतून राष्ट्रभक्तीकडे नेण्याचे कार्य समर्थानी प्रारंभ केले.

आपल्या देशाटनाच्या कालावधीमध्ये समर्थांनी अयोध्या. मथुरा,  वृंदावन, काशी, आसाम, सिमला आणि जयपूर, तंजावर, मद्रास (आताचे चेन्नई ), रामेश्वर, मन्यारगुडी, कन्याकुमारी अशा पूर्व, उत्तर आणि दक्षिण या दिशांना मठांची स्थापना केली. समर्थ जिथे जात तिथे धर्माचा प्रचार आणि शक्तीचा प्रसार करीत असत.

देशाटनानंतर समर्थ जेंव्हा देशाच्या पश्चिमेत म्हणजेच महाराष्ट्रात परत आले (साधारणपणे इ. स. १६४५) तेंव्हा महाबळेश्वर येथे हनुमान मंदिराची स्थापना करून गावातील युवकांना दीक्षा दिली. त्यानंतर वाई, कोरेगाव येथेही शिष्यगण जोडून घेतला. कृष्णाकाठी माहुली येथे त्यांनी एक मठ उभा केला. शिष्यगणांना श्रीराम पंचायतन देऊन श्रीरामोपासना करण्याची आज्ञा दिली.

अधिक वाचा  हर घर सावरकर समितीतर्फे "हर घर सावरकर" अभियानांतर्गत "मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी" हा विशेष कार्यक्रम

महाराष्ट्रभर पसरलेल्या खेड्यापाड्यांतून, भिक्षेच्या निमित्ताने भ्रमण करत समाजमनावर देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्याचा संस्कार करण्यास प्रारंभ केला.

मना सज्जना भक्ती पंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।  असा भक्तीचा संदेश देतानाच,

शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतसे । शक्तियुक्ति जियेठायी, श्रीमंत तेथे धावती ।।

शक्तीने पावती सुखें शक्ती नसता विटंबना ।

असाही लोकशक्तीतून राज्यशक्ती उभारणारा शक्तीचा खणखणीत संदेश देखील दिला.

मुख्य ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण । तिसरे ते सावधपण । सर्वविषईं  

असे धर्मरक्षणासाठी; सावधपणे साधायचे राजकारण सांगत, देवोपासनेबरोबरच, बलोपासना सांगत समर्थ रामदास स्वामी धर्मप्रसार करत होते.

राजकारण करण्याचा उपदेश करत असतानाही; मुख्य ते हरिकथा निरूपण असे सांगण्यास समर्थ विसरत नाही.

तसे पाहता एखाद्या महंताने, शिष्य जोडणे, मठ उभारणे, मंदिरे स्थापणे या बाबी सद्यस्थितीत विशेष वाटणार नाही, परंतु ज्या काळात समर्थ हे कार्य करत होते तो काळ मंदिरे उध्वस्त होण्याचा आणि मुर्ती फोडल्या जाण्याचा होता. त्यामुळे त्यांचे हे कार्य म्हणजे एका दृष्टीने धर्मक्रांतीच म्हणता येईल.

समर्थ स्थापित मठाच्या व्यवस्था, परस्परांशी असणारा संपर्क पाहता; समर्थांचे संघटन उभारणीचे धोरण देखील स्पष्ट होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग न घेता, सांप्रत राजकारणाला पूरक आणि पोषक धर्मकारण करणे हा समर्थांच्या कार्याचा गर्भितार्थ म्हणता येईल.

समर्थांना अभिप्रेत धर्मकारण हे थोतांडवादावर आधारित नव्हते, तर ते सारासार विवेकावर आधारलेले, सत्यशोधन करणारे डोळस धर्मकारण होते.

राजकारणास उपयुक्त धर्मचळवळ करत असताना तिथे आवश्यक ईश्वरीय अनुष्ठान समर्थ कधीच विसरले नाहीत.

अधिक वाचा  शिवसेनेच्या त्या बंडखोर 16 आमदारांचे निलंबन होणारच?

धर्मकारण आणि राजकारण यामध्ये आवश्यक असणारी एक सामायिक बाब समर्थानी सांगितली; ती म्हणजे प्रयत्नवाद !

वन्ही तो चेतवावा रे चेतवितांची चेततो । विवेक जाणिजे तैसा वाढवितांच वाढतो ।।

कोणत्याही क्षेत्रात मनुष्याने केवळ दैववादी न राहता प्रयत्नवादी राहिले पाहिजे हे सांगताना समर्थ सांगतात,

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे । यत्न तो देव जाणावा अंतरी धरितां बरें ।।

सुमारे ११ वर्षे समर्थ सहवासांत राहिलेले गिरीधर स्वामी यांनी लिहिलेल्या ” समर्थ – प्रताप ” या समर्थ चरित्रात एक प्रसंग सांगितला आहे. भगवंत प्राप्तिकरता गोदावरी तीरी समर्थ तपश्चर्या करत असता, श्रीराम चरणी विलीन होण्याचे ठरवतात परंतु त्याचवेळी त्यांना श्रीरामाचा साक्षात्कार होतो आणि प्रभू श्रीराम त्यांना त्यांचे ध्येय सांगतात. हा प्रसंग सांगताना गिरीधर स्वामी लिहितात,

समर्थे सर्वसंग केला यथार्थ । समर्थांसी आज्ञा करतील श्रीरामसमर्थ ।।

धर्मस्थापना भरतखंडी कृतार्थ । शुद्ध परमार्थ दिसतसे ।।

यांतील “धर्मस्थापना भरतखंडी कृतार्थ” हा उल्लेख महत्वाचा आहे. समर्थांचे देशाटन सुरु होण्यापूर्वीचा हा प्रसंग असल्याने, देशाटन करत असतानाच त्यांनी मठस्थापना, श्रीराम-हनुमान स्थापना का केली याचा उलगडा होतो. धर्मस्थापना करण्यासाठीचा मार्ग जर राज्यस्थापनेतून जाणार असेल तर तोही मान्य असला पाहिजे असे समर्थांचे सांगणे होते. समर्थ सांगतात;

देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा ।

मुलुख बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी ।।

आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी, समर्थांनी स्वतंत्र अशा रामदासी संप्रदायाची स्थापना केली.

शब्दांकन : श्रीपादश्रीकांतरामदासी (मेथवडेकर)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love