भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात १८ पक्ष मोठ्या ताकदीने लढतो आहे. तर कॉंग्रेसची इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांचा खेळ खंडोबा आहे. ते पंतप्रधान पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ करणार आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्राचाराची सांगता सभा शिवाजीनगर मधील कुसाळकर चौकात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, सिद्धार्थ शिरोळे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. मेधाताई कुलकर्णी, संजय काकडे, बाळासाहेब बोडके, सनी निम्हण, विजय चौगुले, मुकारी अलगुडे, प्रदीप देशमुख, परशुराम वाडेकर, विनायक कोटकर, संजय डोंगरे, आदित्य माळवे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, देशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील १८ घटक पक्ष माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय खंबीरपणे ही निवडणूक लढवत आहे. तर विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांचा खेळ खंडोबा आहे. त्यांना पंतप्रधान पदासाठी नेते कोण म्हणून विचारलं; तर ते संगीत खुर्चीच्या माध्यमातून ठरवणार आहेत. त्यामुळे जनता हे सर्व पाहात आहे.
ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ट्रेनमध्ये देशातील सर्वसामान्यांना जागा आहे. कारण मोदीजींचा सबका साथ सबका विकास हा मंत्र आहे. तर विरोधकांच्या ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना जागा नाही. राहुल गांधींच्या ट्रेन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना जागा आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या ट्रेनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. तर शरद पवार साहेबांच्या ट्रेनमध्ये केवळ सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे. त्यांना देशाचा प्रमुख नाही, तर परिवाराचा प्रमुख निवडाचा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
माननीय मोदीजींनी केलेल्या कामांची यादी सांगताना देवेंद्रजी म्हणाले की, माननीय मोदीजींनी गेल्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. तर ‘उज्ज्वला योजने’च्या माध्यमातून ५० कोटी लोकांना गॅस सिलिंडर दिले. याशिवाय ‘हर घर नल से’ जलच्या माध्यमातून पिण्याचे पोहचविले. यासोबतच कोविड काळापासून सर्वसामान्यांना मोफत रेशन दिलं. तसेच ६४ कोटी लोकांना दहा लाखांचं कर्ज विना गॅरेंटी स्वतः च्या पायावर उभे केलं. यासोबतच ८० लाख बचत गट उभारून दहा कोटी महिलांना रोजगार मिळवून दिला. आता तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं ठरवलंय.
ते पुढे म्हणाले की, आदिवासी समाज बांधवांचं जीवनमान उंचावण्यासाठी मोदीजींनी काम केलं आहे . तर बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजना राबवून १४ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तसेच त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासोबतच ५५ कोटी लोकांना आयुष्यमान अंतर्गत मदत केली. ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना सर्व औषधोपचार मोफत दिले आहेत. ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजना’ आणली असून, यामाध्यमातून प्रत्येक घराच्या छतावर सोलार पॅनल बसविण्यात येणार आहेत. यातून निर्माण होणारी ३०० युनिट वीज ही त्या घराला मोफत मिळणार आहे. तर उरलेली वीज विकून त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा लाभ घेता येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, १३ तारखेला माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. या योजनांचे कोट्यवधी लाभार्थी आहेत. कोविडची लस प्रत्येक भारतीयाने मोफत घेतल्याने माझ्यासह सर्वच लाभार्थी आहेत. माननीय मोदीजींमुळेच आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. त्यामुळे माननीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे. गरिबी काय असे, हे मी अतिशय जवळून पाहिलं आहे. बूथ स्तरापासून सुरू केल्या प्रवासात आज मला पक्षाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यासर्व अतिशय समर्थपणे पार पाडल्या. पक्षाने आणि पुणेकरांच्या आशीर्वादाने खासदार होण्यापर्यंत पोहोचवलं आहे. यामध्येही पुणेकर मला नक्की साथ देतील. कारण, महापालिकेच्या माध्यमातून काम करतानाही इथले प्रश्नांची मला चांगली जाणीव असल्याने ते सोडविण्यासाठी अहोरात्र काम करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.