पुणे – कोरोनाच्या संकटकाळात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याकडे लक्ष नाही या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचा समाचार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा, असा टोला त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
दरम्यान, अजित पवार यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. ते सर्व जिल्ह्यांवर नजर ठेवून आहेत. कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यात येऊन निवडणूक लढले, ते निवडूनही आले. त्यामुळे आता आपण पुण्यासाठी काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी ते अजित पवार यांच्यावर टीका करतात, त्यांच्या बोलण्याकडे पुणेकरांनी लक्ष देऊ नये अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.















