पुणे—लॉकडाऊन नंतर पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका वाळू पुरवठा व्यवसाय करणाऱ्या तरूणावर गोळीबार करण्यात आला. गोळी गालाला चाटून गेल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. पुण्यातील वानवडी भगत ही घटना घडली. गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले.
मयुर विजय हांडे (वय २९, रा़ हांडेवाडी रोड) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हांडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा तसाच प्रकार घडल्याने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी मयूर हांडे हे वाळू टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन वानवडी येथील इनामदार ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात आले होते. यावेळी एका जणांने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत आले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.