पुणे- यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष असून या वर्षभरात केंद्र सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मदतीने छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ‘होन’ हे चलनी नाणे सोने, चांदी, तांब्याच्या धातूत सादर करीत स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Shivakaleen ‘Hon’ will be published as a souvenir)
आज पुणे दौऱ्यावर असताना पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंबेगाव (बु) येथील ‘शिवसृष्टी’ला त्यांनी भेट दिली आणि त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी आमची चर्चा झाली असून तीन धातुंचे शिवकालीन होन नागरिकांना स्मरणिका म्हणून खरेदी करता येणार आहे. हे होन सुंदर बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासोबत त्यांच्याशी संबंधित माहिती देखील देण्यात येणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून जगदंब तलवार व वाघनखे एकत्रितरित्या भारतात आणावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून जगदंब तलवार आणण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर या दोन्ही ऐतिहासिक गोष्टी एकत्रितच भारतात परत आणता येतील.” वाघनखांविषयी पत्रव्यवहाराची औपचारिकता इंग्लंडकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वा वर्षे लागले असून संपूर्ण वर्षभर महाराष्ट्र राज्य, देशभरात इतकेच नव्हे तर दुबई, लंडन सारख्या देशांत देखील अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वर्षभरात या अंतर्गत १०० हून अधिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग, छत्रपती शिवाजी महाराज यांवर आधारित चित्रपट महोत्सव, शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन असे उपक्रम घेण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या ९ ऑगस्ट पासून मंत्रालयात रोज सकाळी ९.४५ वाजता पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टीमद्वारे महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांनी कृतीमधून, आचरणातून दिलेली शिकवण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तब्बल ८८ हजार वस्तू आज महाराष्ट्रातील विविध गोडाऊन, रिझर्व बँक ऑफ इंडिया अशा ठिकाणी आहेत. बिहार, गुजरातप्रमाणे या सर्वांचे एकत्रित जागतिक दर्जाचे संग्रहालय करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस असून मुंबईत ३० एकर जागेत ते उभारण्यासाठी सुयोग्य जागेचा शोध घेऊन ती सुनिश्चित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे,असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी देखील संवाद साधला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर शिवसंस्कार व्हावेत हे शिक्षक व संस्थाचालकांचे उत्तरदायित्व असून त्यासाठी विद्यार्थांना आवर्जून शिवसृष्टीत घेऊन यावे असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
विविध कार्यक्रम व मालिकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची बाल वयातील भूमिका साकारलेल्या श्रीश खेडेकर यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. आपल्या कामातून जमा केलेली रक्कम श्रीश याने विविध सामाजिक कार्यासाठी दान केली आहे, त्याच्या याच कामगिरीची दखल घेत मुनगंटीवार यांनी त्याचे कौतुक केले.