पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे शैक्षणिक चॅनेल सुरू करणार- वर्षा गायकवाड

शिक्षण
Spread the love

पुणे–पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात स्वतंत्रपणे शैक्षणिक चॅनेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे लवकरच शिक्षण विभागातर्फे अधिकृतरीत्या शैक्षणिक चॅनेल सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. गायकवाड यांनी ही घोषणा केली. करोनाचे संकट आले असले त्यातून संधी म्हणून आता ऑनलाइन, ट्युटूब, फेसबुकच्या या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शैक्षणिक चॅनेल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करणे आवश्‍यक असल्याचे सांगत गायकवाड यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना तातडीने पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

बालचित्रवाणी पुनरूज्जीवीत करणार

बालचित्रवाणीमधील स्टुडिओ वापराविना पडून आहेत. ते सर्व साहित्य अद्ययावत करीत त्याचा उपयोग शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना उद्‌बोधन करण्यासाठी केला जाणार आहे. अभ्यासक्रमातील लेखक, कवी यांचेही मार्गदर्शन या माध्यमातून होणे आवश्‍यक आहे. त्याचा विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर अधिक ज्ञान आत्मसात करता येणे शक्‍य होणार असल्याची माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षक भरती लवकरच

शिक्षक भरती पवित्र पोर्टल माध्यमातूनच होणार आहे. मध्यंतरी एसईबीसी संवर्गास स्थगिती दिल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. एकूण 6 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मात्र हा प्रस्ताव सध्या सामान्य प्रशासन विभागाकडे आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. लवकरच भरतीप्रक्रिया सुरू होईल, असा विश्‍वास गायकवाड यांनी व्यक्‍त केला.

दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

शिक्षक भरती घोटाळ्या अडकलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

शाळा बाह्य मुलांसाठी विशेष मोहीम व ऍप

करोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. आता सर्व शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. यापूर्वीच नववी ते बारावीच्या शाळा, आता पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. विशेषत: जी मुले शाळा व शिक्षणापासून वंचित राहिले आहेत, अशा मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी आणि शाळेत उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शाळाबाह्य मुले विशेषत: त्यातील मुली शाळेत कसा आणता येईल, यावर मोहिमेचे मुख्य काम राहील. त्यासाठी ऍपही सुरू करण्यात येणार असल्याचे प्रा. गायकवाड यांनी म्हटले आहे.

किशोर मासिक आता ऑनलाइन

किशोर मासिकांचा सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने किशोर मासिकाच्या मोबाइल ऍपचे उद्‌घाटन करण्यात आले. गेल्या 50 वर्षातील सर्व किशोरची मासिक विनामूल्य आता ऑनलाइनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर्षी किशोर मासिकाची किमंत 80 रुपये आहे, तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ती 50 रुपयांत सभासदांना उपलब्ध होतील, असेही गायकवाड यांनी सांगितले.

शिक्षणमंत्र्यांची शहरातील शाळांना दिली भेटी

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी करोनाच्या संकटानंतर सुरू झालेल्या शाळांना भेटी दिली. आपटे प्रशाला, मॉडर्न हायस्कूलसह पालिकेच्या शाळांना भेट देत करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळेत नियमांची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, याचा आढावा घेतला. या शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. करोनानंतर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *