जैवविविधतेचं उपवन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ..! : जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने विद्यापीठाची हरित सफर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिरवळ ही कायमच सर्वांचं आकर्षण राहिली आहे. दुतर्फा असणारी झाडं, रस्त्यावर पडलेला फुलापानांचा सडा हा कायमच निसर्गाची सुंदर अनुभूती देतो.. आज असणाऱ्या जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने विद्यापीठातील या हरित वैभवाची सफर….

सुमारे चारशे एकरात सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवविविधतेचा इतिहास हा ब्रिटिश काळापासून सुरू होतो. या काळात लावण्यात आलेलं पतंगीची झाडं आजही विद्यापीठात आहेत. याबाबत माहिती देताना विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट सांगतात,  विद्यापीठात आजमितीला जवळपास १०० ते १२० वर्षाची अनेक वडाची झाडं आहेत. मुख्य इमारतीसमोर असणारं गोरखचिंचेच झाडंही अनेक वर्ष जुनं झाड आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७०० हुन अधिक प्रजातींच्या वनस्पती आहेत. पुणे महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेनुसार विद्यापीठात एकूण ५० ते ५५ हजार झाडे आहेत. त्यातील साधारण ४०० वनस्पती या औषधी वनस्पती आहेत. या औषधी वनस्पतींमध्ये मधुमेहावर उपयोगी असणारी सप्तरंगी ही वनस्पती तसेच दशमुळारीष्ठ, सीताअशोक, बारतोंडी, देवबाभूळ आदीही वनस्पती आहेत. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अनेक वनस्पतींची लागवडही येथे करण्यात आली आहे. गुळवेल लागवडीसारखा मोठा प्रकल्पही इथे हाती घेण्यात आला आहे.

चांदकुडा, युरोपियन ऑलिव्ह, पाडळ, अग्निमंथन अशी अनेक प्रदेशनिष्ठ दुर्मिळ वनस्पती आहेत. वड, पिंपळ, उंबर यांच्याही अनेक प्रजाती विद्यापीठात पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं असणारी झाडं इथे सर्वांचं आकर्षक ठरतात.

विद्यापीठाने बांबूची लागवड करत त्यापासून अनेक वस्तू बनविण्याचा प्रकल्पही केला आहे. तसेच येत्या काळात नवीन बांबू पार्कदेखील उभारण्यात येणार आहे.

विद्यापीठात बिनविषारी साप व नागपासून ते किंग कोब्रापर्यंत  शेकडो नाग व साप आढळून येतात. त्याचबरोबर हरणटोळ, धामण, मांजऱ्या, विविध पाली, सरडे, विन्चू, कोळी, नागतोडेही आहेत. तर औषधी वनस्पती बागेत राखीबगळा, टीटवि, शेकाट्या, हरीयाल, पोपट, कोकीळ, भारद्वाज, खंडया, पान कोंबडी, रान कोंबडी, सातभाई, हॉर्न बिल असे अनेक  दुर्मिळ पक्षीही आहेत. तसेच  फुलपाखरंही आहेत. यामुळे विद्यापीठात प्राणी पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास आहे. मॉर्निंग वॉक व ओपन जिमच्या निमित्ताने हजारो नागरिक येथील नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेताना दिसतात.

विद्यापीठाला लाभलेला हा जैवविधतेचा वारसा आहे

विद्यापीठाला लाभलेला हा जैवविधतेचा वारसा आहे. हा वारसा आम्ही जतन करत तो वाढविण्याचाही प्रयत्न करत आहोत. हेरिटेज वॉकसारख्या प्रकल्पातून आम्ही हा लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. विद्यार्थी, नागरिक, शेतकरी यांना जैव विविधतेचे महत्व, जतन, संगोपन याविषयी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याच्या माध्यमातून जनजागृतीही केली जात आहे.

  – प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *