पुणे -मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ – मृदुंगाच्या गजरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे शुक्रवारी (दि.२ ) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले.टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती असल्याने मंदिर परिसर मोकळा मोकळा दिसून येत होता. तरी उपस्थित वारक-यांचा उत्साह ओसंडून वाहत होता .
माऊलीच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटा नादाने या वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकड़ा आरती झाली, पहाटे सव्वाचार ते साडे पाच यावेळात माऊलीना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला. सकाळी नऊ ते अकरा दरम्यान विना मंडपात भागवत महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.दुपारी बारा ते साडेबारा मंदिर गाभारा स्वच्छ करण्यात आला.त्यानंतर समाधीस पाणी घालण्यात येऊन महानैवेद्य दाखविण्यात आले.दुपारी चार वाजता मुख्य प्रस्थान कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.साडे चार वाजता वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.पाच वाजता ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मानाच्या हिरा व मोती आश्वाचा देऊळवाड्यात प्रवेश झाला.श्रीगुरु हैबतबाबा प्रतिनिधी यांचे तर्फे श्रींची आरती करण्यात आली.
संस्थान तर्फे देखील श्रींची आरती करण्यात येऊन त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.त्यानंतर वीणा मंडपात श्रींच्या चल पादुका आणण्यात आल्या.संस्थान तर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात आले तर श्रीगुरू हैबतबाबा प्रातिनिधी तर्फे दिंडीप्रमुख,प्रतिष्ठित मानकरी यांना श्रीफळ प्रसाद वाटप करण्यात आले.मानापानाच्या कार्यक्रमानतर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास माउलींच्या पालखीने वीणा मंडपातुन प्रस्थान ठेवले. यावेळी अवघा देऊळवाडा माऊली- माऊलीच्या जयघोषाने दुमदुमुन गेला होता. पादुका विना मंडपातुन व मंदिर प्रदक्षिणा करून दर्शन मंडप हॉल आजोळघरी विराजमान करण्यात आल्या.
प्रस्थान सोहळ्याला विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे, खासदार संजय जाधव, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, तहसीलदार वैशाली वाघमारे,गटविकास अधिकारी अजय जोशी,मुख्याधिकारी अंकुश जाधव,तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे,मंडल अधिकारी चेतन चासकर,प्रशासकीय अधिकारी किशोर तरकासे,पालखी सोहळा प्रमुख एड.विकास ढगे पाटील,विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,बाळासाहेब चोपदार,राजाभाऊ चोपदार,रामभाऊ चोपदार, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे,देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,माजी सभापती डी.डी.भोसले पाटील,अजित वडगावकर व इतर मान्यवर,नगरसेवक उपस्थित होते.