भक्तीची शक्ती जागविणारे संत शिरोमणी नामदेव महाराज


संत ज्ञानेश्वरांनी पाया रचलेल्या भागवत धर्माच्या विस्ताराचे मोलाचे काम करणारे संत नामदेव हे संतांच्या मांदियाळीत अतिशय महत्वाचे आहेत.

तत्कालीन परिस्थितीत केवळ मराठी मुलुखातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, गुजरात,मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, हरियाणा,उत्तरांचल,हिमाचल प्रदेश अशा इतर प्रांतातही भक्तीच्या प्रसाराचे कार्य करणे; दया,क्षमा,शांतीचे शिक्षण देणे ,जातीधर्माच्या भिंती ओलांडून समाजपरिवर्तन व प्रबोधन करणे हे अलौकिक कार्य त्यांनी केलेले दिसून येते.

उत्तरेकडील या राज्यातील समाजमनावर नामदेवांचा इतका  प्रभाव पडला की आजही या सर्व प्रदेशात संत नामदेवांची मंदिरे आहेत. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांच्या अलौकिकत्वाची प्रचिती येत जाते.

देह जावो अथवा राहो,

पांडुरंगी माझा भावो।”

अशी भक्तीची दृढता असणारे संत नामदेव, शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प करणारे संत नामदेव,

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी।”

हे ब्रीद अक्षरशः जगणारे संत नामदेव, भारतभरात भागवत धर्माचा प्रसार करणारे आणि त्यासाठी हिंदी ,पंजाबी , गुजराती अशा विविध भाषा आत्मसात करून त्यातून विविध पदे ,अभंग यांची रचना करणारे संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी प्रसंगी मन घट्ट करून  सर्व जबाबदारी पेलणारे व ज्ञानेश्वरांनंतर अर्धे शतक म्हणजे सुमारे पन्नास वर्षे भगवंत धर्माची पताका उंचावत ठेवणारे संत नामदेव… अशी नामदेवांची विविध रूपे आपल्या मनःपटलावर कोरली जातात.एवढी योग्यता असूनही श्री विठ्ठलाच्या चरणी सर्व भक्तांच्या पायाची धूळ लागण्याची आस बाळगणारे,

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ।

संत पाय हिरे देती वरु।।

हे जीवनाचे अंतिम ध्येय मानणारे नामदेव नक्कीच लाखो भगद्वभक्ताच्या हृदयावर राज्य करतात.

अधिक वाचा  माऊलींच्या पालखी सोहळ्याने विठुनामाच्या बळावर दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे लीलया केली पार

नामदेवांबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या आख्यायिकांमधूनही त्यांच्या भक्तीची दृढता ,भूतदया ,सर्वांभूती पांडुरंग पाहण्याची क्षमता दिसून येते.

हिंगोली तालुक्यातील नरसी बामणी या गावी कार्तिक शुद्ध एकादशी, शके ११९२ या दिवशी म्हणजेच २६ ऑक्टोबर १२७० रोजी  गोणाई व दामाशेट या दांपत्याच्या पोटी नामदेवांचा जन्म झाला. घरी मुळातच धार्मिक वातावरण व परंपरेने चालत आलेला शिंपी समाजाचा कपड्याचा व्यवसाय असणारे हे कुटुंब नंतर विठ्ठलभक्तीमुळे पंढरपूरात स्थायिक झाले.

एकदा नामदेवांचे वडील काही कामानिमित्त परगावी गेले असताना विठ्ठलाला नैवेद्य दाखविणसाठी बाळ नामदेवाला मंदिरात जावे लागले. रोज देव जेवत असणार आणि आज आपण नैवेद्य घेऊन आल्यामुळे तो जेवत नाही असे समजून

समूळ घेतला पृथ्वीचा भार

माझाचि जोजार काय तुला.

नको पाहू अंत पांडुरंगे आई,

नामा हरिपायी घाली मिठी।

“अशी आर्त साद घातली.शेवटी बालभक्ताच्या हट्टापुढे परमेश्वरही झुकला व नामदेवांनी आणलेला नैवेद्य त्याने खालला. बालवयातच भक्तीची एवढी दृढता असणारे नामदेव सर्वांभूती विठ्ठल पहात होते. त्यामुळेच आपली भाकरी पळवणाऱ्या कुत्र्याच्या मागे त्याला कोरडी भाकरी खायला लागू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन ते धावले.

नामदेवांचे संपूर्ण कुटुंबच भक्तिमार्गावर चालणारे होते.त्यांचे मातापिता, पत्नी राजाई, पुत्र नारायण ,विठ्ठल ,महादेव ,गोविंद ,कन्या लिंबाई व त्यांच्या घरी दासी म्हणून राहणारी संत जनाबाई या सर्वांच्या ठायी भगवत भक्तीचे सामर्थ्य होते. जनाबाई स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणवून घेत असे, मात्र नामदेवांनी तिलाही दास्यपदातून मुक्त केले. नामदेवांच्या सहवासामुळे  जनाबाई संतपदाला पोहोचल्या. अभंगरचना करू लागल्या. घरी कुटुंबाची जबाबदारी मोठी असल्याने नामदेवांनी आपला व्यवसाय सांभाळावा असे त्यांच्या वडिलांना वाटे परंतु विठ्ठलाच्या भक्तीपुढे नामदेवांना प्रपंच महत्वाचा वाटत नसे.

अधिक वाचा  शिवरायांचा अपमान करणारी विधाने करताना कोश्यारी आणि त्रिवेदींना लाज कशी वाटत नाही - उदयनराजे

एकदा दामाजींनी नामदेवांना कापड विक्री करण्यासाठी पाठवले.गोरगरीब उघडे लोक थंडीवाऱ्याने काकडलेले पाहून नामदेवांना त्यांची दया आली, त्यांनी सगळे कापड त्या गोरगरिबांना वाटून टाकले.पैशाऐवजी तारण म्हणून दगड घेऊन ते घरी आले.हे पाहून वडील संतापले व रागाने तो दगड फोडायला धावले तेव्हा तो दगड त्यांना सोन्याचा झालेला दिसला.ही गोष्ट सर्वत्र पसरली काही लबाड लोक तो दगड परत मागायला आले त्यावेळी नामदेवांनी तो लगेच त्यांना देऊन टाकला पण लोकांच्या  हाती जाताच त्याचा पुन्हा पाषाण झाला.मात्र नामदेवांची दृढ भक्ती सर्वांना समजली व पुढे कोणी त्यांना विरोध केला नाही.

नामदेव हे विठ्ठलाचे लाडके भक्त बनले, त्याचा थोडासा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला.एकदा सर्व संतमंडळी गोरोबा काकांच्या घरी जमले असताना चिमुकल्या मुक्ताईने त्यांना “या सर्वांची मडकी तपासा व कच्ची मडकी कोणती व पक्की मडकी कोणती ते पहा.” असे सांगितले तेव्हा गोरोबा थापटणे घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावर मारून पाहू लागले.नामदेवांना याचा राग आला तेव्हा, “हे मडके कच्चे आहे.”असे मुक्ताईने म्हटल्यावर सर्वजण हसले.नामदेव चिडून तिथून निघून विठ्ठलाजवळ आले.’गुरुशिवाय भक्ती अपूर्ण आहे.’ हे समजल्यामुळे ते विठ्ठलाच्या आज्ञेनुसार औंढया नागनाथ येथे आले.

तेथील शिवालयात एक वृद्ध गृहस्थ पिंडीवर पाय ठेवून झोपलेले नामदेवांनी पाहिले. नामदेव त्यांचे पाय उचलून इतरत्र ठेवू लागले, तेव्हा प्रत्येक ठिकाणी शिवपिंड दिसू लागली व ईश्वर सर्वत्र भरलेला आहे हा साक्षात्कार नामदेवांना झाला. ते वयस्कर गृहस्थ म्हणजे ‘विसोबा खेचर’ नामदेवांचे गुरु.

अधिक वाचा  ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधी सोहळा संपन्न : चार लाख वैष्णवजणांचा आळंदीत हरिनामाचा गजर

नामदेवांनी अनेक अभंग,भूपाळ्या, आरत्या रचल्या. ब्रजभाषेतही त्यांनी काही रचना केल्या. नामदेवांच्या कीर्तनात श्रोते तल्लीन होत असत.असे म्हणतात की स्वतः पांडुरंग नामदेवांच्या कीर्तनात टाळ वाजवत असे व नाच करत असे.

ज्ञानेश्वरांच्या समवेत नामदेवांनी तीर्थाटन केले.आयोध्या ,मथुरा, वृंदावन,हरिद्वार,काशी,   कुरुक्षेत्र येथून पुढे ते मारवाडच्या वालुकामय प्रदेशात आले ,सगळे तहानलेले होते,तेथे असणाऱ्या विहिरीचे पाणी अगदी तळाशी गेलेले.ज्ञानेश्वर आपल्या योगसामर्थ्याने सूक्ष्म रूप घेऊन पाणी प्यायले. नामदेवांनी तहानेने व्याकुळ झाल्याने विठ्ठलाचा धावा केला व काही क्षणात विहीर तुडूंब पाण्याने भरली. नामदेव व इतर प्रवाशांनाही पाणी मिळाले.

 संपूर्ण यात्रेमध्ये दुपारी ज्ञानेश्वरांचे निरूपण, व रात्री नामदेवांचे कीर्तन रंगू लागले. जुनागडला नरसी मेहता यांना नामदेवांनी भक्ती व रामनामाची महती सांगितली. नामदेवांना तिथे अनेक शिष्य मिळाले.रामानंद, कबीर, नानक ,दादू दयाळ, बहोरदास, मीराबाई, मलूकदास अशी संतांची मांदियाळी संपूर्ण देशभर उभी राहिली.नामदेवांनी गुरुवाणीतून लिहिलेली ६१पदे गुरुग्रंथसाहेब या शीख पंथाच्या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. नामदेवांनी अठरा पगड जातींना एकत्र केले, समाजाची संघटना बांधली. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार , जगमित्र नागा नरहरी सोनार, दासी जनाबाई यांना भक्तीमार्गात सहाय्य केले.

वयाच्या ऐंशीव्या वर्षी आषाढ कृष्ण त्रयोदशी, शके १२७२म्हणजेच ३जुलै १३५०रोजी  अत्यंत समाधानाने विठ्ठलचरणी त्यांनी आपला देह ठेवला. पंढरपूरात विठ्ठल मंदिराच्या पायरीजवळ तसेच पंजाबमधील घुमान येथेही नामदेवांची समाधी आहे.

संतशिरोमणी नामदेव महाराज भक्तीच्या शक्तीने  भागवत भक्तांच्या हृदयी अजरामर झालेले आहेत.

लेखन :  सौ.अर्चना देव

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love