पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट : ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा : बाहेर न पडण्याचे आवाहन


पुणे– जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढच्या ४८ तासांत जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुफान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरातही एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या दरम्यान, बाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुण्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात सुरू आहे. या सोबतच खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने या तालुक्यात असणा-या घाटमाथा परिसरात तुफान अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तास हे महत्वाचे राहणार आहे. या पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवस बाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

अधिक वाचा  यंदा द्राक्षाचं भरघोस उत्पादन :४२ द्राक्ष बागायतदारांची निर्यातीसाठी नोंदणी

दरम्यान, पुणे शहरातही एलो अलर्ट हवामान विभागाने सांगितला आहे. पावसामुळे झाडपडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर न पडता घरीच राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे पुण्यातील धरणे जवळपास निम्मे भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही धरणे वेगाने भरली आहेत. पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसरातच ही धरणे असल्याने लवकरच ही धरणे पूर्ण भरणार आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडले जाणार आहे.

१५ तारखेला कमी होऊन पुन्हा वाढणार पाऊस

पुढील ४८ तासांत हा मुसळधार पाऊस पुण्यासह मुंबई आणि घाटमाथ्यावर होणार आहे. १५  तारखेला पाऊस कमी होईल तर त्यानंतर म्हणजेच १६ जुलैपासून वातावरणात पुन्हा बदल होऊन पावसाची परिस्थिती निर्माण होईल. मध्यम ते मुसळधार असा हा पाऊस असेल. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक या चार ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असे पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. कोकण, गोवा, पालघर, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचे ते म्हणाले अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास करणे टाळावे. विशेषत: घाट माथ्याच्या परिसरातून प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण : केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले पोलिस निरीक्षकाच्या निलंबनाचे आदेश

पर्यटन स्थळे ३ दिवस बंद

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे तीन दिवस बंद करण्यात यावे या साठी वनविभागाने जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून कलम १४४ लावण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने हा पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक डोंगर परिसरात, किल्ले, तसेच धबधबे आणि धरणांच्या परिसरात गर्दी करत आहेत. मात्र, पुढील तिन दिवस हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने ही पर्यटन स्थळे धोकादायक झाली आहे. या ठिकाणी जाणे जिवावर बेतू शकते. यामुळे ही पर्यटन स्थळे बंद करण्यात यावे अशी मागणी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून कलम १४४ लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे. १४ ते १७ जुलै दरम्यान ही पर्यटन बंदी राहणार आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love