अतिवृष्टीचा इशारा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे–पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने थैमान घातले असून, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज (१४ जुलै) पुणे व पिंपरीतील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे व पिंपरी महापालिकेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा, खासगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ. शाळांना १४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतला आहे.  पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पालिकेनेदेखील १४ जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळांना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) १४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.

 दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरक्षेच्या कारणाने विद्यार्थी आणि शिक्षकांना बुधवारी संध्याकाळी ४ नंतर घरी जाण्याची मुभा दिली.

पुणे जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी

दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी सुविधा द्यावी

खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून शहरातील आयटी कंपन्या आणि खासगी अस्थापनांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी सुविधा द्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने आता १५ जुलै पर्यंत मुसळाधार पाऊस राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, शहरात खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले असतानाच आता खासगी अस्थापना तसेच आयटी कंपन्यांनाही महापालिकेने वर्क फ्रॉम होमसाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती केली आहे.

शहरात पावसामुळे वाहतूककोंडी होत आहेच, शिवाय, मुठा नदीतही मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या शिवाय, पावसामुळे शहरात मोठया प्रमाणात झाडपडीच्या घटनाही घडत आहेत. अशा स्थिती संभाव्य धोके टाळण्यासाठी महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *