राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

महाराष्ट्र लेख
Spread the love

गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परीक्षा ||

गावची भंगता अवदशा | येईल देशा || ग्रामगीता.

गावागावातले लोकनेतृत्व लोकांच्या कल्याणासाठी ,शांतता आणि सौहार्दासाठी काम करण्याचे ठरवून नेतृत्व करत असतो. आज लोक कल्याण हा उद्देश बाजूला सारून प्रत्येक गोष्टीत राजकारण करून अशांतता निर्माण होत आहे. गावची समृद्धी, शांतता आणि विकासाला हे मारक ठरत आहे. हेच संत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेत सांगून ठेवले आहे. सामाजिक बंधुभावाचे महत्व सांगणारे त्यांचे गीत सर्वांना माहिती आहे

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे ||

 दे वरचि असा दे ||

 याच बरोबर शाळेत आम्ही शिकलेली कविता,

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली,

ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ||

ही सर्वांना ज्ञात आहेच. अशा त्यांच्या प्रासादिक रचनात लोककल्याणाची त्यांची तळमळ, समाजहित सांगणारा स्पष्टपणा दिसतो. तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील एक आधुनिक संत. आध्यात्मिक क्षेत्रातले महान योगी, नेतृत्व करणारा नेता, कुशल संघटक, वक्ता आणि संगीतकार.

खंजिरीच्या ठेक्यावर मराठी व हिन्दी पद गाऊन श्रोत्यांना तल्लीन व्हायला लावत. वरखेड इथले समर्थ आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु.  खंजिरीवर गाणी म्हणण्याचा त्यांना लहान पणापासूनच नाद. आत्मज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी घर सोडून रामटेक, रामदिघी आणि सालबर्डी इथल्या घनदाट जंगलात जाऊन ते राहिले.

जंगलात ल्या वास्तव्यात त्यांनी ध्यानधारणा आणि योगाभ्यास केला होता. भजनाच्या निमित्ताने त्यांनी तिर्थस्थळांचे दर्शन घेतले होते. तर समाजाचे जवळून परीक्षण केले होते. देशाची प्रगती व्हायला हवी असेल तर सामान्य लोकांची स्थिति सुधारली पाहिजे असे त्यांना वाटले. देशातल्या खेड्यांचा कायापालट झाला पाहिजे. त्यासाठी समाजात शिस्त आली पाहिजे, स्वच्छतेचे महत्व वाटले पाहिजे, ते मनावर बिंबवले तर खेडी लख्ख होतील .त्यासाठी सूत कताई. शाळा, जागोजागी दवाखाने, व नियमित प्रार्थना याची जोड द्यायला हवी हे त्यांच्या लक्षात आले.  मनी नाही भाव देवा मला पाव… सारखी उत्स्फूर्त आणि प्रेरणा देणारी हजारो भजने त्यांनी लिहिली.

 मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव

देव अशानं, भेटायचा नाही हो ।

देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o

 त्यांची सहज आणि सोप्या शब्दातली गाणी लोकांच्या हृदयाला भिडत. खंजिरीच्या तालावर जीवनाचं वास्तव सांगणारी, शिक्षण देणारी रचना हे त्यांचा वैशिष्ट्य होतं.

 संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या संतांच्या काळची सामाजिक परिस्थिति वेगळी होती. मात्र तुकडोजी महाराजांच्या काळात देश पारतंत्र्याच्या जोखडाखाली पिचून गेला होता. त्यांच्या भजनात राष्ट्रीय ऐक्य, स्वातंत्र्य, विषमता, दु:ख हेही विषय असायचे. त्यांनी सुरूवातीला ‘तुकड्यादास’ या नावाने काही रचना लिहिल्या. त्यांच्या रचनांमध्ये सामाजिक परिस्थितीचे चित्रण असायचे. आपल्या देशाचे ‘सुजलाम सुफलाम’ चित्र त्यांनीही रंगविले होते.

त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजे लोकशिक्षणाचा आदर्श वस्तूपाठ आहे. त्यांनी खेडोपाड्यात प्रत्यक्ष जाऊन ग्रामसंस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले. ते त्यासाठी आयुष्यभर भटकत राहिले. ते म्हणत, “माझा देव साधनारूपाने देवळात व रानात असला, अनुभवरूपाने तो मनात व चिंतनात असला तरी कार्यारूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण रूपात पसरलेली गावे हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा’ हीच माझी पूजा आहे”.

गाव सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, सुसंस्कृत व्हावा, सुशिक्षित व्हावा ,परस्परस्नेहभाव जागवावा, श्रमप्रतिष्ठा वाढावी अशी तळमळ व्यक्त करून ही ग्रामगीता त्यांनी ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. जसं समर्थ रामदासांनी कसं लिहावं ? हे एका समासात सांगितलं आहे तसं, संत तुकाडोजिंनी काय वाचावं आणि कशासाठी वाचावं हे ग्रामगीतेत सांगितलं आहे. आपण जे वाचतो त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. ज्या प्रकारचं आपलं जीवन आहे त्याला उपयुक्त असंच वाचन आपण केलं पाहिजे.

स्वातंत्र्यलढ्याची चळवळ त्यांनी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविली. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची प्रेरणा महत्वाची ठरली. चिमुर, आष्टी व बेनोडा यातील चळवळीचे ते प्रेरणास्थान होते.

बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ?

हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥

स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी ।

सोडुनी आज दशा का अशी ?

या लढ्यात त्यांनी सांस्कृतीक व आध्यात्मिक कार्यक्रमांतून चळवळीबद्दल लोकांचे प्रबोधन केले. यावेळी त्यांना चंद्रपूरला अटक करून नागपुर व रायपूर येथील तुरुंगांत १०० दिवस ठेवले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळीचे काम हाती घेतले. नागपूरजवळील मोझरी गावांत ‘गुरुकुंज आश्रम’ स्थापन केला. त्यांनी ग्रामीण पुन:र्निर्माणाचे मूलभूत व रचनात्मक  काम हाती घेतले.

महात्मा गांधी, डों. राजेंद्रप्रसाद आदींनी त्यांच्या या कामाची वाखाणणी केली व गौरव केला. एका भव्य कार्यक्रमात देशाचे प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी “…आप संत नही, राष्ट्रसंत है” असे सद्गदित होऊन उद्गार काढले आणि तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी देऊन गौरविले. तेव्हापासून ते लोकांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ म्हणून माहीत झाले. आवेशपूर्ण भावनांनी ओतप्रोत भरलेले व मनाचा ठाव घेणारे त्यांचे ‘खंजिरीभजन’ हा वैशिष्ठ्यपूर्ण व परिणामकारक उदबोधनाचा प्रकार ठरला.

१९५५ मध्ये जपान येथे संपन्न झालेल्या विश्वधर्मपरिषदेत भारतातून तुकडोजी महाराजांना आमंत्रीत केले गेले. त्यावेळीही लोकांनी त्यांची खूप वाहवा केली.या प्रसंगी त्यांचे भजन सादर झाले होते ते दिल्ली च्या राजघाटावर नेहमी ऐकवले जाते.ते असे- 

हर देश में तू …

हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एकही है ।

तेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥

 १९५६ मध्ये त्यांनी राष्ट्रातील विविध जाती, पंथ, धर्माच्या संस्थांचे प्रमुख व साधू यांचे मोठे संघटन केले. अश्या प्रकारचे संघटन प्रथमच झाले होते.

१९४५ चा बंगालचा दुष्काळ, १९६२ चे चीनचे आक्रमण, १९६५ मधील पाकीस्तानबरोबरचे युद्ध, (या दोन्ही युद्ध प्रसंगी त्यांनी सीमेवर जाऊन सैन्याला धीर देण्यासाठी विरगीते गायली होती.) १९६२ मधील कोयनाचा भूकंप अशा विविध राष्ट्रसंकटाच्या वेळी त्यांनी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत केली.त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला होता.

महिलांची उन्नती हा त्यांच्या प्रबोधनाचा एक महत्वाचा विषय होता. कुटुंब व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था आणि समाज व्यवस्था ही स्त्री वर कशी अवलंबून असते हे ते कीर्तनातून मांडत. त्यांनी ब्रम्ह, नाशिवंत देह, संसार वं परमार्थ, मानवी प्रयत्न, ईश्वर, विश्व धर्म आणि प्रार्थना हे तत्वज्ञान विषय मांडले.    

 ११ ऑक्टोबर, १९६८ रोजी निधन झाले. त्यांच्या मोझरी गावच्या गुरुकुंज आश्रमासमोरच त्यांची समाधी आहे. ती आजही सर्व सामान्यांना जीवन जगण्याची योग्य दिशा आणि प्रेरणा देते.

डॉ. नयना कासखेडीकर. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *