पुरस्काराचे मानकरी म्हणजे सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे दूत- उल्हास पवार

पुणे-मुंबई
Spread the love

‘पुणे -भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत, भारतीय लोककला व साहित्य यांना आपल्या भारतात मोठी समृद्ध परंपरा असून, श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हे मान्यवर कला व साहित्याची संस्कृती एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणारे दूत आहेत’ असे विचार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. 27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार प्रदान समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

याप्रसंगी बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित निर्मला गोगटे आणि शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, वेदमूर्ती पं. श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित केले गेले. देवीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रारंभी संयोजक आबा बागुल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘या लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित अनेक नामवंतांना आयुष्यात पुढे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. किंबहुना हा पुरस्कार मिळाल्यानंतर भारतरत्न पुरस्कारापर्यंत जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होतो असेही म्हटले जाते. या सर्व मान्यवरांच्या योगदानामुळे समाजात वैचारिक व बौद्धिक संस्कार अधिक रुजतात हे महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित निर्मला गोगटे म्हणाल्या की, आयुष्याच्या उत्तरार्धात मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे देवीचा आशीर्वादच आहे. या महोत्सवात गेल्या 27 वर्षांत अनेक स्त्रियांचा गौरव केला गेला याबद्दल मी संयोजकांचे अभिनंदन करते. स्त्री ही फार मोठी शक्ती असून, या शक्तीची पूर्णत: ओळखे होणे खरंच अवघड आहे. बहिणबाईंसारख्या ज्येष्ठ कवयित्रीने अशिक्षित असूनही जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले ही व अशी अनेक उदाहरणे स्त्रीशक्तीची जाणीव करून देतात, असे मत निर्मला गोगटे यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित डॉ. रेवा नातू म्हणाल्या की, कोणताही पुरस्कार ही केवळ शाबासकी नसून, या पुरस्कारामुळे कलावंताला ऊर्जा मिळते. तसेच अशा पुरस्कारांमुळे आपल्यावरील जबाबदारीची देखील जाणीव होते.

ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर म्हणाले की, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षानंतर होणारा कदाचित हा पहिलाच सांस्कृतिक कार्यक्रम असावा. आता पुन्हा नव्याने सर्वसाधारण जीवन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे असेही ते म्हणाले.

लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर म्हणाल्या की, अगदी लहान वयातच हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझ्यासारख्या लोककलावंत मुलीस खूपच प्रोत्साहन मिळाले.

वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे व प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांचीही मनोगते झाली. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, महिला महोत्सव अध्यक्ष जयश्री बागुल, महोत्सवाचे सर्व ट्रस्टी, अनेक नगरसेवक व मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या 27 वर्षांच्या इतिहासावर आधारित चित्रफीत दाखवली गेली. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. आभारप्रदर्शन घनश्याम सावंत यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *