पुणे- एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून त्या दोघींचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड भागात घडला आहे. दोन नराधमांनी बलात्कार आणि विनयभंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांनी त्यांच्या इतर तीन मित्रांच्या मदतीने या दोन मुलींचे अपहरण केले. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या मंगळवारी १५ डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून पिडीत मुलींपैकी एकीचे वय १६ तर एकीचे वय १४ वर्षे आहे. पिंपरी-चिंचवड भागातील अजंठानगरमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरासमोर या दोघी खेळत होत्या. तेंव्हा आरोपी आशिष सरोदे (वय २० वर्षे) आणि करण साबळे(वय-२१)तिथं आले. दोघे शेजारीच राहणारे असल्याने त्यांची एकमेकांशी तोंड ओळख होती. याचाच फायदा घेत या दोघांनी मावस बहिणींशी संवाद साधला. फिरायला जाऊ असं सांगूंन ते लगतच्या पत्राशेड आणि मोडकळीस आलेल्या जुन्या कंपन्यांच्या परिसरात आले. पत्राशेडमधील पाण्याच्या टाकीजवळ आशिषने 16 वर्षीय मुलीवर जबरदस्ती करत बलात्कार केला तर मोडकळीस आलेल्या इमारतीत करणने 14 वर्षीय मुलीवर जबरदस्ती करून विनयभंग केला.
आरोपी यावर थांबले नाही, तर त्यांनी मावस बहिणींना घेऊन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आले. मग दोघांनी तिथं निवास सुतार (वय 20), तेजस वाघमारे (वय 19) आणि कार्तिक उर्फ टिंक्या चव्हाण (वय 21), सर्व रा. अजंठानगर) या तिघांना बोलावून घेतलं. कारमध्ये ते तिथं पोहचताच दोघींना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि तिथून काही अंतरावर असलेल्या चिंचवड स्टेशन चौकात गाडी थांबवली. तेंव्हा काही नागरिकांनी इतक्या छोट्याशा कारमध्ये सात जण कसे काय बसले म्हणून त्या गाडीकडे नजर टाकली. त्यातील काहींनी त्यांना हटकले असता, मावस बहिणींना तिथंच सोडून पाच आरोपींनी तिथून पळ काढला.
त्यानंतर चिंचवड स्टेशन चौकातून या मुली कशाबशा आपल्या घरी पोहचल्या. घडला प्रकार त्यांनी कुटुंबियांच्या कानावर टाकताच, त्यांना धक्का बसला. मग त्यांनी निगडी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्र हलवत पाच ही आरोपींना जेरबंद केलं. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.