पुणे- कायदा-सुव्यवस्था, तसेच गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता पुणे शहर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ असल्याचा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार यांनी केला.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ सदाशिव पेठ नारायण पेठ शुक्रवार पेठ शनिवार पेठ परिसरामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, कसबाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, कुणाल टिळक, बापू मानकर, राजेंद्र काकडे, अमित कंक, राजू परदेशी, राणी कांबळे, प्रशांत सुर्वे, चंद्रकांत पोटे, अजय दराडे, निलेश जगताप, प्रणव गंजीवाले, वैशाली नाईक, निर्मल हरीहर, अश्विनी पवार सहभागी झाले होते.
मोहोळ म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली. गुंड, तसेच सराईत चोरट्यांच्या टोळ्यांविरुद्ध बडगा उगारला आहे. त्यामुळे गुंडांना जरब बसली आहे. गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग हा चिंतेचा विषय ठरल्याने पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या समुपदेशनाचा उपक्रम हाती घेतला आहे. गंभीर गुन्हे रोखण्यासाठी कारवाई, तसेच कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य, वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेता स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आर्थिक गुन्ह्यांसाठी स्वतंत्र शाखा निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर ठरले आहे.
मोहोळ पुढे म्हणाले, “पुणे पोलिसांनी ‘माय सेफ ॲप’ सुरू केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुंडगिरी रोखणे, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिल्याने पुणे हे सुरक्षित शहर आहे हे एनसीआरबीच्या अहवालावरून निदर्शनास येते. परंतु विरोधकांकडे कोणतेही विकासाचे ठोस मुद्दे चर्चेला नसल्याने ते राजकीय पूर्वग्रहदूषित आरोप करीत आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. पुणे पोलीसांचे मानसिक खच्चीकरण आणि पुणेकरांमध्ये भीती निर्माण करण्याचा विरोधकांचा कुटील डाव आहे.”