‘फेक नरेटिव्ह’ आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांविरुद्ध हिंदू समाजाने एकत्र यावे – चारुदत्त गंधे यांचे आवाहन

पुणे हिंदू संमेलन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी
पुणे हिंदू संमेलन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी

पुणे- “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असताना, आज केवळ संघटना वाढवणे हे ध्येय नसून समाजापुढील ‘फेक नरेटिव्ह’ आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांसारख्या (‘डेमोग्राफिक चेंजेस’) गंभीर आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने जात-पात विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे  प्रतिपादन चारुदत्त गंधे यांनी केले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवती नगर परिसरात आयोजित भव्य ‘हिंदू संमेलनात’ ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर धर्माचार्य रोकडेश्वर महाराज, मातृशक्तीच्या उद्बोधक डॉ. सुनीताताई जंगले, संमेलन समितीचे अध्यक्ष इनामदार काका आणि पोकळे  पाटील उपस्थित होते.

गंधे म्हणाले की, १९२५ मध्ये डॉ. हेडगेवारांनी जेव्हा नागपूरमध्ये संघाची स्थापना केली, तेव्हा ‘हिंदू’ म्हणणे ही देखील एक शिवी मानली जात होती. मात्र, आज शंभर वर्षांच्या तपस्येनंतर संघाचे कार्य ८९ हजार दैनंदिन शाखांच्या माध्यमातून भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार ‘हिंदू स्वयंसेवक संघा’च्या रूपात पोहोचले आहे. ज्याप्रमाणे ‘व्यासिष्टम जगत सर्वम’ असे म्हटले जाते, त्याप्रमाणे आज जीवनाचे कोणतेही क्षेत्र संघाच्या विचारांपासून दूर राहिलेले नाही. मग ते विद्यार्थी क्षेत्र असो, कामगार असो वा विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी राष्ट्रभक्तांचे संघटन करण्याचे कार्य अव्याहत सुरू आहे.

फेक नरेटिव्ह’ आणि वैचारिक आक्रमणे

सध्याच्या काळात हिंदू धर्मावर आणि परंपरेवर होणाऱ्या वैचारिक आक्रमणांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नव्हता, असा खोटा प्रचार (Fake Narrative) केला जात असल्याचे सांगत स्वतः डॉ. हेडगेवारांनी स्वातंत्र्यलढ्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला होता, याचा पुरावा दिला. तसेच, आपली मंदिरे, खगोलशास्त्र आणि आयुर्वेद हे विज्ञानावर आधारित असूनही “तुमच्याकडे काहीच नव्हते” असे भासवून सुशिक्षित लोकांचा बुद्धिभेद केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  अलीकडेच पुण्यात झालेल्या एका मेळाव्यात वारकरी संप्रदायाच्या जयघोषाची ज्या पद्धतीने खिल्ली उडवण्यात आली, ती अत्यंत खेदजनक असून अशा देशविघातक शक्तींना संविधानाच्या चौकटीत राहून अभिव्यक्ती आणि कायद्याच्या शस्त्राने उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  सामाजिक सलोखा मजबूत करण्याचे सरसंघचालकांचे आवाहन

लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि धर्मांतर

देशातील लोकसंख्याशास्त्रीय बदल (‘डेमोग्राफिक चेंजेस’) या विषयावर बोलताना त्यांनी युरोपमधील परिस्थितीचा दाखला दिला. “जेव्हा राष्ट्रापेक्षा धर्म वरचढ ठरतो, तेव्हा राष्ट्रनिष्ठा धोक्यात येते,” असे सांगत त्यांनी सायलेंट आक्रमणाबाबत सावध केले. ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून होणारे धर्मांतर आणि विदेशी शक्तींच्या निष्ठा यावरही त्यांनी प्रकाश टाकला. हे युद्ध आज रणांगणावर नाही, तर सोशल मीडिया आणि वैचारिक स्तरावर सुरू असून ते ओळखणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

समरसता आणि सेवा हाच आत्मा

संघाचा मूळ स्थायी भाव ‘व्यक्ती निर्माण आणि त्यातून राष्ट्र निर्माण’ हा असल्याचे त्यांनी नमूद केले. समरसतेचे उदाहरण देताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला संघाने दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख केला. संघात जात-पातीला स्थान नसून केवळ ‘स्वयंसेवक’ हीच ओळख असते.  नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोणत्याही निरोपाची वाट न पाहता सर्वात आधी पोहोचणारा स्वयंसेवक हा ‘भारत मातेची सेवा’ याच भावनेने कार्य करत असतो, असे त्यांनी सांगितले.

“भेदभाव मिटवून टाका, दीन-दलितांचा उद्धार करा आणि एक सशक्त संघटन उभे करून नवा इतिहास रचा,” असा संदेश त्यांनी दिला.”हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय” हीच आपली एकमेव ओळख असली पाहिजे, असा मंत्र त्यांनी उपस्थितांना दिला.

अधिक वाचा  वेदना व्यवस्थापन या शाखेला सुपर स्पेशालिटी म्हणून मान्यता मिळावी - तज्ञ : इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन,आयएसएसपीकॉन २०२४ पुण्यात राष्ट्रीय परिषद संपन्न

कुटुंब प्रबोधन आणि पंचपरिवर्तनातूनच समर्थ राष्ट्राची निर्मिती शक्य – डॉ. सुनिता जंगले  

“सनातन हिंदू जीवन संस्कृतीमध्ये समाज हे कुटुंबांनी बनलेले एक एकक आहे आणि या कुटुंबाचा भावनिक आधार म्हणून मातृशक्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. राष्ट्रनिर्मितीचा विचार करताना केवळ स्वतःचा विचार न करता स्वभाषा, स्वभूषा आणि स्वसंस्कृतीला राष्ट्राशी जोडणे हीच काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुनिता जंगले यांनी यावेळी केले.

डॉ. जंगले यांनी स्वबोध, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण आणि नागरी शिष्टाचार या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्पष्ट केले की, स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे स्पर्धक नसून ते पौराणिक ग्रंथांमधील ‘अर्धनारी नटेश्वर’ या संकल्पनेप्रमाणे एकमेकांना परस्पर पूरक आहेत.

कुटुंब प्रबोधनाचा विचार मांडताना डॉ. जंगले यांनी ‘५-भ’ (भाषा, भूषा, भवन, भोजन आणि भ्रमण) या सूत्राचा उहापोह केला. आधुनिक काळात परदेशी भाषा शिकणे आवश्यक झाले असले तरी, आपली मातृभाषा कालबाह्य होऊ नये यासाठी पालकांनी घरामध्ये मुलांशी संवाद साधताना मातृभाषेचाच वापर करावा, असा आग्रह त्यांनी धरला. तसेच, वेशभूषेच्या बाबतीत पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण टाळून आपल्या संस्कृतीला साजेसे आणि समाजात आदरास पात्र ठरतील असेच कपडे परिधान करण्याचे संस्कार मुलींवर करावेत, असेही त्या म्हणाल्या.

घरातील वातावरणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, घरामध्ये दररोज देवपूजा करून पावित्र्य जपले पाहिजे आणि या धार्मिक विधींमध्ये मुलांनाही सहभागी करून घेतले पाहिजे. आहार संस्कृतीवर भाष्य करताना त्यांनी भारतीय भोजन परंपरेला ‘पूर्ण अन्न’ संबोधले. विवाह किंवा अन्य घरगुती सोहळ्यांमध्ये संपत्तीचे प्रदर्शन न करता संस्कृतीचे दर्शन घडवावे आणि अन्नाची नासाडी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले. दिवसातून किमान एक वेळ तरी सर्व कुटुंबीयांनी एकत्र बसून जेवण करावे, ज्यामुळे संवाद वाढून कौटुंबिक बंध अधिक दृढ होतात, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

अधिक वाचा  पोलीस भरती : १६०० मीटर धावताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बुलढाण्यातील पुरुषोत्तमचे खाकीचे स्वप्न अधुरे

पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना डॉ. जंगले यांनी एक विशेष कृती आराखडा मांडला. कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा स्मृतीदिनानिमित्त वर्षाकाठी किमान पाच वृक्षांची लागवड केल्यास आगामी काळात भारत भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक समरसतेचा संदेश देताना त्यांनी जाती, वर्ण किंवा आर्थिक स्तरावरून भेदभाव न करता सर्व पंथांच्या संतांचा आदर करावा आणि घरातील मदतनीस महिलांनाही आपलसे करावे, असे आवाहन केले.

धर्म आणि राष्ट्ररक्षणासाठी हिंदू समाजाने संघटित व्हावे – धर्माचार्य रोकडेश्वर महाराज

धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नसून आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचे संगोपन करणे, बंधू-भगिनींशी आपुलकीने वागणे आणि ज्या महापुरुषांनी समाजाला दिशा दिली त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने पुढे जाणे म्हणजे खरा धर्म होय असे धर्माचार्य रोकडेश्वर महाराज यांनी यावेळी सांगितले

भगवद्गीतेतील ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ या शब्दाचा संदर्भ देत रोकडेश्वर महाराज यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक कार्यक्षेत्र हे धर्मक्षेत्रच असते आणि आपल्या प्रत्येक कृतीतून धर्म दिसून आला पाहिजे. त्यांनी ‘कुलधर्म’ आणि ‘शास्त्रधर्म’ या संकल्पना मांडताना सांगितले की, जशी आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, तशीच काळजी समाज आणि राष्ट्राची घेणे ही आपली जबाबदारी आहे. ‘हे विश्वची माझे घर’ ही माउलींची शिकवण आपल्या स्वतःपासून आणि आपल्या समाजापासून सुरू व्हायला हवी .

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love