पुणे- काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राव हजार होते तर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला प्रतिबंध कसा करता येईल याबाबत राव स्वत: प्रशासकीय बैठका घेत होते.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून सौरभ राव हे कोरोना संकटाच्या काळात उपाययोजना, नियम, निर्बंध या संपूर्ण प्रक्रियेत अग्रभागी आहेत. तसेच ते ज्या भागात जास्त प्रादुर्भाव झाला आहे त्या भागात स्वत: जाऊन काय नियोजन करता येईल याबाबत जातीने लक्ष घालत आहेत.
काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोर झालेल्या बैठकीला ते हजर होते. त्यावेळी इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही हजार होते. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही चाचणी करून घ्यावी लागेल तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे.