पुणे– देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Shrimant Dagadusheth Halvai Ganpati ) चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण (Manik Chavan), उपाध्यक्ष सुनील रासने (Sunil Rasane), कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने(Hemant Rasane) उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची परडी व सुकामेवा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, सौरभ गाडगीळ यांनी ही मूर्ती साकारली होती.
मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी व मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांसह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा व महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.