पुणे – कोट्यवधींचे कर्ज, देणेकरांचे फोन यातून कायमची सुटका होईल या भ्रमात एकाने मित्राचा खून करून स्वतःचा खून झाल्याचे भासवले. कर्जातून पळवाट काढण्यासाठी त्याने ही युक्ती त्याने केली खरी परंतु घटनास्थळी मिळालेल्या ब्ल्यूटूथचा दुसरा भाग आरोपीच्या घरी सापडला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
कर्जबाजारी असलेल्या आरोपीचे मेहबूब दस्तगिर शेख नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने त्याचा मित्र संदीप पुंडलिक माईनकर याचा खून केला.
22 नोव्हेंबर रोजी पुण्यातील बाणेर येथे दर्गाजवळ अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जाळून टाकळण्यात आला होता. तसेच, मृतदेहाच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली. ज्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटली. मात्र, त्याच्या मृतदेहाशेजारी एक ‘ब्ल्यूटूथ’ मिळाले. यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले.
आरोपी मेहबूब आणि मृत संदीप हे दोघे ही ओळखीचे असून काही वर्षांपूर्वी त्यांनी खासगी कंपनीत एकत्र काम केले होते. मात्र, संदीप हा जिथे जागा मिळेल तिथे, फुटपाथ किंवा इतर ठिकाणी राहात असे. त्याला दारूचे व्यसन होते, असे पोलिसांनी सांगितले. तर, आरोपी मेहबूबवर कोट्यवधींचे कर्च होते. देणेकरांचे फोन येत होते. यामुळे त्याने मित्राचा खून करून स्वतःचा खून झाल्याचे भासवले. कर्जातून पळवाट काढण्यासाठी त्याने ही युक्ती केली.
ठरल्यानुसार बाणेर येथील दर्गाजवळ मित्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. मात्र, मृत व्यक्तीच्या अर्धवट जळालेल्या कागदावरून तो व्यक्ती संदीप असल्याचं समोर आलं. तसेच, घटनास्थळी मिळालेल्या ब्ल्यूटूथचा दुसरा भाग हा आरोपीच्या घरी सापडला. तसेच, तांत्रिक तपास करून आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली. त्याने त्यांच्या मित्राचा कट रचून खून केला असल्याची कबुली दिली आहे.