पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. या घटनेला वेगळे वळण लागले आणि पूजाने आत्महत्या केली की तीचा खून झाला अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पुणे पोलिसांना याबाबत पत्र पाठवून या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज पुणे पोलिसांनी आजपर्यंतच्या सर्व तपासचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलीस कामाला लागले आहेत. पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक गेले आहे.
पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्याशी असलेल्या संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पूजा पहिल्या मजल्यावर राहत होती. टू-बीएचकेच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. सोसायटीच्या समोर सिमेंटचा रस्ता आहे. पहिला मजला आणि रोडचं अंतर 30 ते 32 फूट असल्याचं सांगण्यात येतं. पूजाने रविवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता आत्महत्या केली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. 30 ते 32 फूटावरून तिने उडी मारल्याने तिच्या डोक्याला मार गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान भाजपच्या नेत्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पूजाच्या मृत्यूला आठ दिवस झाल्यानंतरही या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाले नाही. या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.