रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोल गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

क्राईम
Spread the love

पुणे– पुणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी दमछाक होत आहे. अनेकांनी आपल्या रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून काळा बाजारातून या इंजेक्शनची अव्वाच्या सव्वा किमतीला खरेदी केली आहे. असा काळा बाजार करणाऱ्या काहींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र, अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोल गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनचे निरिक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर), संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.

आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या वतीने बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याला २५ हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक महेश ढवाण, हवालदार आर. जे. जाधव, आर. एस. भोसले, डी. एन. दराडे, निखिल जाधव आदींनी सहभाग घेतला.प्रकार असा आला उघडकीस-बारामतीतील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एकाशी संपर्क साधला. तो बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती. त्यानुसार इंजेक्शन देणाऱ्याने त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे ३५ हजार असे दोन इंजेक्शनचे ७० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली. पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी वाहनांसह या टोळीतील काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसीवीरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड भरत ते फेविक्विकने व्यवस्थित पॅक करत हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते. या टोळीने अनेकांना हे इंजेक्शन विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार तपास करण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *