पुणे(प्रतिनिधि)–पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील ‘एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज’ या पबमध्ये मद्यपार्टी व ड्रग्जसेवन सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेकडून या वादग्रस्त पबवर दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. ही बातमी समजताच पतित पावन संघटनेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. पबवर पतित पावन संघटनेकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा पबकडे वळविला. यावेळी पबच्या फलकासह लोगोची तोडफोड करण्यात आली.
सोशल मीडियावर बऱयाचशा ऍक्टिव्हिटिज सुरू आहे. मागच्या महिन्यात कल्याणीनगर येथे घडलेल्या घटनेमुळे पुण्याची संस्कृती धोक्मयात आली आहे. पुण्यामध्ये पब संस्कृती फोफावताना दिसते आहे. ही संस्कृती हद्दपार झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी केली आहे.
घाटे म्हणाले, कालच्या घटनेनंतर आपण बघितले, की अनेक राजकीय मंडळींनी या घटनेवर टिप्पणी केली. सरकार म्हणून जे काम करणे आवश्यक आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतीलच. परंतु पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिका या विषयाशी संबंधित जी खाती असतील, अशा सर्व खात्यांमधल्या कुचकामी अधिकाऱयांनी अशा विषयांमध्ये ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन, महानगरपालिका या विषयात काही करणार नसेल, तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल. पुण्यातील पब संस्कृती हद्दपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
पुण्यातील शाळांच्या बाहेर असलेल्या पानटपऱया काढून टाकण्यासंबंधी एक निवेदन यापूर्वी पोलिसांना दिले होते. पोलीस ते उद्ध्वस्त का करत नाहीत? अनेक शाळांच्या बाहेर गुटखा आणि धूम्रपान सर्रास चालू असते. पुण्यामध्ये ड्रग्जची विक्री खुलेआम पद्धतीने होताना दिसते. केवळ छोटय़ा अधिकाऱयांवर कारवाई नको. या विषयात संबंधित जो वरिष्ठ अधिकारी असेल, त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार असल्याचेही घाटे यांनी सांगितले.