पुणे— स्वातंत्र्य संग्रामाविषयी अंतर ठेऊन अनास्था बाळगणारेच आज स्वातंत्र्याचा दीपस्तंभ व साक्षीदार असलेल्या “नॅशनल हेरॉल्ड” वर्तमानपत्राचे धिंडवडे काढण्यासाठी राजकीय हेतूने पुढे सरसावल्याचे स्पष्ट होत आहे असा आरोप करत, “स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याचे “सांगणाऱ्या अभिनेत्रींना पद्मभूषण पुरस्कार देऊन, त्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाई सत्ताधाऱ्यांकडून वेगळी ती अपेक्षा काय करणार?असाउपरोधिक टोला कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भाजपला लगावला आहे.
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९३७ साली ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वर्तमानपत्र ‘पारतंत्र्यातील भारतात’ स्वातंत्र्याची जागरूकता निर्माण करण्याकरता व स्वातंत्र्य संग्रामास प्रेरणा व दिशा देण्याकरीता ३ आवृत्त्यांमध्ये नॅशनल हेरॉल्ड (इंग्रजी), नवजीवन (हिंदी) आणि कौमीआवाज (उर्दू या तीन भाषांमध्ये) सुरू केले. त्या वेळेस कॉंग्रेस विरोधी असणारे अनेक नेते स्वातंत्र्य संग्रामात हिरीहिरीने भाग घेत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत होते, असे तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१९२५ ते १९४७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांच्या विरोधात कुठेही स्पष्ट कृतीशील योजनाबद्ध भूमिका नव्हती, मात्र महात्मा गांधी, पं नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलम आझाद आदींच्या नेतृत्वाखालीच् भारतास स्वातंत्र्य मिळाले व अखेर ब्रिटिशांना हा देश सोडून जावा लागला.
भारत स्वतंत्र झाल्यामुळे लोकशाहीरुपी भारतात अटलबिहारी वाजपेयी वा नरेंद्रजी मोदी यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचे ऊचीत भान भाजपावासीयांनी ठेवले पाहिजे. परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्य संग्रामाविषयी अंतर ठेऊन अनास्था बाळगणारेच आज स्वातंत्र्याचा दीपस्तंभ व साक्षीदार असलेल्या “नॅशनल हेरॉल्ड” वर्तमानपत्राचे धिंडवडे काढण्यासाठी राजकीय हेतूने पुढे सरसावल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकशाही मार्गाने देशाच्या सत्तास्थानी आलेल्या भाजपाच्या सत्ताधिशांना अहंकार व मस्तवालपणाचा दर्प चढला असून, देश “कॉंग्रेस मुक्त नव्हे तर विरोध मुक्त भारत” करण्याचे मनसुबे मोदी-शहा मंडळी करू लागली असून, सरकारी यंत्रणांचा व नागरी पैशांचा गैरवापर ‘राजकीय विरोधकांवर’ करण्याचा गैरप्रकार चालू आहे. परंतु सरकारी यंत्रणांच्या जाचाला व दबावाला कॉंग्रेस बळी पडणार नसून, जनतेच्या हितासाठी अधिकाधिक कटीबध्द राहणार असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसला खच्ची करण्याच्या मोदी-शहांच्या तथाकथित प्रयत्नांमुळे ऊलट ‘देशातील तमाम कॉंग्रेसजन अघिक एकजूटीने लढलेले पाहायला मिळेल असेही गोपाळदादा तिवारी यांनी नमूद केले आहे.