पुणे- आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटण्यात गैर काय आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी उपस्थित केला.
फुरसंगी येथे एका कार्यक्रमाला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आत्ता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. सगळय़ांना वाटते, की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात, असे माझे म्हणणे आहे. आपले महाविकास आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपदाच्या मागे लागू नये. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाविकास आघाडी म्हणून काम करत आहोत. कामात सातत्य पहायला मिळत आहे.
घोडेबाजार महाराष्ट्राला न शोभणारा
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते स्वतः पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. महाविकास आघडीचा हा मोठेपणा आहे. घोडेबाजार वगैरेसारख्या गोष्टी या महाराष्ट्राला न शोभणाऱया आहेत. दोन दशकानंतर ही निवडणूक होत आहे. कोणत्याही राज्याच्या राजकारणासाठी हे हिताचे नाही, अशी नाराजी त्यांनी या वेळी व्यक्त केली.
हे सुडाचे राजकारण
सोनिया गांधी, राहुल गांधी यांना इडीचे समन्स आले याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे. ज्या महिलेने देशाची एवढी वर्षे सेवा केली. त्यांना कोरोनाची लागणही झाली आहे. मात्र, त्यातही केंद्र सरकार अशाप्रकारच्या नोटीसा पाठवून राजकारण करत आहे. ही नवीन पद्धत भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे. हे दुर्दैवी आहे, अशी टीकाही सुळे यांनी या वेळी केली.