राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणिएनपावर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा विकास घडविणारा उपक्रम


पुणे : महाराष्ट्र राज्यात शालेय मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडविणाऱ्या उपक्रमाचा प्रायोगिक टप्प्याची आज पुणे येथे यशस्वी सांगता झाली. पालघर, ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यातील ४० आदर्श शाळांमध्ये हा उपक्रम राबविल्या नंतर पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये महाराष्ट्रातील ४८८ आदर्श शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याची तयारी सुरु झाली आहे.

ऑक्टोबर २०२२ पासून महाराष्ट्रातील ४० आदर्श शाळांमध्ये स्वजीवी महाराष्ट्र नावाचा एक पथदर्शी उपक्रम राबविण्यात आला.  शिक्षण आयुक्त डॉ. सूरज मांढरे यांच्या मान्यतेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणि एनपावर या संस्थामध्ये अधिकृत सामंजस्य करार झाला व उपक्रमाची सुरवात झाली.

स्वजीवी महाराष्ट्र अंतर्गत ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातील इयत्ता ६वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेची मानसिकता घडवण्याचे शिक्षण दिले गेले. विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण शैलीद्वारे उद्योजकांच्या मानसिकतेची ओळख करून देणे हे या उपक्रमाचे ध्येय होते. विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे आपल्या सभोवतालच्या समस्या ओळखून त्यावर मात करण्यासाठी कल्पक उपाय शोधले व त्यामधून सेवा व उत्पादनांची निर्मिती देखील केली.

अधिक वाचा  सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार - अजित पवार

एनपावरचे संस्थापक सुशील मुणगेकर यांनी स्वतः आदर्श शाळेच्या निवडक शिक्षकांना या कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले. शिक्षकांनी स्वजीवी प्रतिनिधीच्या सहाय्याने तीन महिने अथक परिश्रम घेत मुलांना समस्या ओळखणे, समस्या सोडवणे, ग्राहक-केंद्रित समाधान-निर्मिती अशा संकल्पना आकर्षक कथा व बोधयुक्त खेळ यातून शिकविल्या. मुख्यतः हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करण्यात आला व त्याची अंमलबजावणी देखील मराठी भाषेतच करण्यात आली.

प्रत्येक शाळेतून निवडक उद्योजकीय कल्पना जिल्हा स्तरावर – ‘स्वजीवी तेजांकित – २०२३’ सोहळ्यात सादर केल्या गेल्या. पुणे, ठाणे आणि पालघर येथे  जिल्हानिहाय उपांत्य फेरी सोहळा रंगला. तीनही जिल्ह्यातून निवडून आलेल्या प्रत्येकी तीन सर्वोत्कृष्ट कल्पना राज्य स्तरावर ‘स्वजीवी तेजांकित – २०२३’ महाअंतिम सोहळ्यात सादर केल्या गेल्या.

अधिक वाचा  #Suta: अस्सल स्वदेशी वस्त्र कारागिरीसाठी ख्याती असलेल्या साडी ब्रँड 'सुता'चे कोथरूडमध्ये नवीन दालन सुरू

हा सोहळा दिनांक ८ मार्च २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र कार्यालय, कुमठेकर रोड येथे संपन्न झाला. राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे याचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहसंचालक श्री. रमाकांत काठमोरे, आणि उपसंचालक, डॉ. कमलादेवी आवटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. नेहा बेलसरे, उपसंचालक आणि आंतराष्ट्रीय गुणवत्ता विभाग कक्ष प्रमुख श्रीमती मनीषा यादव यांची उपस्थती आणि शुभेच्छा लाभल्या. तसेच परिषदेचे व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक माळी तसेच अधिव्याख्याता चंदन कुलकर्णी राज्य समन्वयक  शाम राऊत यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन लाभले. 

या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक रा.शै.सं.व.प्र.प. महाराष्ट्र, पुणे म्हणाल्या की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मुलांना उद्यमी बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्वजीवी महाराष्ट्र सारखे उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहेत.”

एनपावर संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सुशील मुणगेकर म्हणाले की,आपली आजची शालेय पिढी हे आपले उद्याचे मनुष्यबळ आहे. त्यांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शिक्षण घेणे जसे आवश्यक आहे तसेच या शिक्षणाचा उपयोग करून देशाचे भवितव्य घडविण्यासाठी योग्य मानसिकतेची देखील गरज आहे. शालेय अवस्थेतच विद्यार्थ्यांना नवनिर्मितीच्या संकल्पना, उद्योजकतेची मानसिकता, आणि २१व्या शतकातील जीवनकौशल्य याचे शिक्षण दिल्याने मुलांचा सर्वांगिण विकास होईल आणि ते भविष्यातील आव्हानांवर मात करून समस्यांमध्ये संधी शोधून  उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होतील. स्वजीवी महाराष्ट्र मुलांमधील स्वप्न, जिद्द व विश्वास जतन करत त्यांना स्वतःसाठी आणि आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी मौल्यवान निर्मिती करण्यास प्रोत्साहित करते.”

अधिक वाचा  पुण्यात इंडियन प्लंबिंग कॉन्फरन्स अ‍ॅन्ड एक्झिबिशनच्या 28 व्या आवृत्तीचे आयोजन

स्वजीवीचा पथदर्शी उपक्रम आता यशस्वीपणे पार पडल्यानंतर हा उपक्रम महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमधील ४८८ आदर्श शाळांमध्ये पोहोचावा यासाठीचे दमदार तयारी सुरु आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love