लाखो भाविकांच्या साक्षीने रंगला तुकाराम बीज सोहळा

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे–वैष्णवांनी फुललेला इंद्रायणीचा तीर… कीर्तन, प्रवचनांचा चाललेला निरंतर जागर… टाळ, मृदंगाचा गजर.. भाविकांच्या मुखातून निघणारा तुकोबारायांच्या नामाचा अखंडीत जयघोष… यामुळे देहूनगरी गुरुवारी  ‘तुकोबा’मय होऊन गेली. मध्यान्हीची वेळ झाली अन् सार्‍यांच्याच नजरा ‘नांदूरकी’च्या पाना – पानावर एकवटल्या. पानांची सळसळ होताच ‘तुकाबा-तुकोबा’ असा घोष करीत उपस्थित भक्त – भागवतांनी पुष्पवृष्टी केली.

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीजसोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांची पाऊले आज  इंद्रायणीच्या तीराकडे वळली होती. श्री क्षेत्र देहूनगरीतील श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर भक्तगणांनी गजबजले होते. वैष्णवजनांच्या मांदीयाळीने जणू भक्तीचा महापूरच लोटला होता. पहाटे चार वाजल्यापासूनच मुख्य मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला होता. सर्वप्रथम काकडआरती झाली. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष हभप  नितीन महाराज मोरे, विश्वस्त संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे , भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते पहाटे पावणे पाच वाजता देऊळवाड्यातील श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरामध्ये, साडे पाच वाजता शिळा मंदिरामध्ये आणि सहा वाजता तपोनिधी नारायण महाराज यांची, त्यानंतर वैकुंठगमन मंदिर येथे महापूजा करण्यात आली.

दरम्यान वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त खासदार श्रीरंग बारणे, प्रांत संजय आसवले तहसीलदार गीता गायकवाड तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते. वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त बापूसाहेब मोरे देहूकर यांचे वैकुंठ गमन प्रसंगावर आधारित कीर्तन पार पडले.

संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास देऊळवाड्यातून पालखीचे प्रस्थान ठेवण्यात आले. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. चौघडा, अब्दागिरी, छडीदार, चौपदार, मानकरी याचा लवाजमा घेवून सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही पालखी वैकुंठगमन मंदिरासमोर आली. त्याठिकाणी हभप बापूसाहेब महाराज देहूकर यांचे संत तुकाराम महाराज यांच्या ‘प्रयाण’ प्रसंगावर ‘घोटविन लाळ, ब्रम्हज्ञान्या हाती । आत्मस्थिती सांधविन।।’ हे कीर्तन झाले. त्यांनी संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील अभंगाचे निरूपण केले. पालखीतून पादुका उतरवून त्या वैकुंठगमन मंदिरामध्ये ठेवण्यात आल्या. त्या ठिकाणी आदींच्या उपस्थितीत पाद्यपूजा करण्यात आली. त्यापाठोपाठ झालेल्या आरतीनंतर ‘तुकोबा – तुकोबा’चा जयघोष झाला. मध्यान्हीची वेळ होताच सर्वांच्याच नजरा नांदुरकी वृक्षावर एकवटल्या. ज्या झाडाखाली उभे राहून तुकोबाराय वैकुंठाला गेले, त्या वृक्षाची पाने क्षणभर सळसळली अन् भाविकांनी पुष्पवृष्टी केली. पाठोपाठ टाळयांचा कडकडाट करीत तुकाराम महारांजाचा जयजयकार करण्यात आला.

अस्मानी संकटातून सावरण्याची शक्ती दे

राज्यात झालेल्या गारपीटीमुळे भाविकांची संख्या रोडावली असल्याचे चित्र आज दिसून येत होते. मराठवाड्यासह, विदर्भ आणि बारामती, सोलापूर आदी भागामध्ये पावसासह झालेल्या जोरदार गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे तुफान नुकसान झाले आहे. त्याचे पडसाद आजच्या तुकाराम बीज सोहळयामध्ये दिसून आले. तुकाराम बीज सोहळ्यासाठी या भागातून येणार्‍या भाविकांची संख्या खुप आहे. परंतू , गारपीटीमुळे सुमारे ७० ते ७५ हजार भाविकांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात आले.तर, उपस्थित भाविकांनी गारपीटसारख्या अस्मानी संकटातून सावरण्याची शक्ती द्यावी, असे साकडे तुकोबारायांना घातले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *