पुणे(प्रतिनिधि)–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कोणतीही ऑफर दिली नाही तर त्यांना सल्ला दिला, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. दरम्यान, शरद पवारांचं राजकारण ज्यांना माहिती आहे, त्यांना हे सगळं शरद पवारांचं वागणं समजू शकंतं. ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथे बोलताना, “त्यांच्या (शरद पवार} विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे म्हटलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही तर चांगला सल्ला दिला होता. मोदी म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊनही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेसोबत यावं. त्यामुळे राजकीय मनसुभे सुटतील.
ते पुढे म्हणाले की, “आधीच तुम्ही बुडाले आहात आणि आता तुम्ही बुडत्या जहाजात जात आहात. पवारांनी पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवल्याचं सांगितलं. पवारांची राजकीय कारकिर्द पाहिली तर ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला, त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि मग काँग्रेसमधून बाहेर पडले. १९७७ पासून ते आजपर्यंत आपण पाहिलं असेल जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलिन होतात, मग ते बाहेर पडतात. त्यामुळे मोदींनी असा सल्ला देण्याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहितेय त्यांना समजेल.
काही लोक नुसते बडबड करत सुटले आहेत
उद्धव ठाकरे फडणवीसांवर प्रत्येकवेळी टीका करताना दिसतात. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, काही लोक सिरीयस बोलले तर ते मनावर घ्यायचं असतं. मात्र काही लोक नुसते बडबड करत सुटले आहेत. त्यामुळे ते सिरीयस झाले आहेत. त्यांना मदतीची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरेंना कोणत्यातरी मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असं मी त्यांच्या पक्षातील लोकांना सांगतो आणि डॉक्टरांकडे नेऊन त्यांच्या मनावरचं ओझं दूर करा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला आहे.
.