पुणे-पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सिद्धार्ध बनसोडेसह 4 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत आतापर्यंत सिद्धार्थ बनसोडे याच्यासह 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिस सिद्धार्थ बनसोडेचा शोध घेत होते. त्यानंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली .चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. तिथल्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडी रॉडसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत याबाबत कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे सिद्धार्थ बनसोडे, त्यांच्या पीए सह 10 जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.