पुणे – राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना करोनाच्या संकटामुळे मानधन देण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज्यातील सर्व लोककलावंतांच्या महितीची सूची सांस्कृतिक विभागामार्फत लवकरात लवकर तयार करण्यात येईल आणि सर्वांना मानधन ठरलेल्या दिवशीच मिळेल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आज पुण्यात रंगभूमीदिनाच्या पूर्व संध्येला बोलताना दिली.
राज्य शासानाच्यावतीने देण्यात येणारे विठाबाई नारायणगावकर लोककला जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर आणि आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य कलावंत मधुवंती दांडेकर यांना जाहीर झालेला आहे. रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या दोन्ही कलावंताचा संवाद पुणे संस्थेने पुणेकरांच्यावतीने राज्यमंत्री येड्रावकर यांच्याहस्ते मानपत्र देऊन कृतज्ञता सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते उल्हास पवार होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, अभिनेते प्रशांत दामले, प्रवीण तरडे, कोल्हापूरचे डॉ. दशरथ काळे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालक निकिता मोघे, कौन्सिल फॉर लिटरेचर ऍण्ड कल्चरचे महेश थोरवे, महाराष्ट्र कला प्रसारणी सभेचे कार्यवाह सचिन ईटकर आणि महावीर जैन विद्यालयाचे सचिव युवराज शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
करोना महामारीच्या लॉकडाऊनच्या काळात पडद्यामागिल कलावंतांना आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंना मदत करणा-या किशोर सरपोतदार, महाराष्ट्र तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, प्रियांका चौधरी, गायक मंदार पाटणकर, आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, युवासेनेचे किरण साळी, काँग्रेसचे अमित बागूल, मनसने चित्रपट सेनेचे रमेश परदेशी, भाजपचे सनी निम्हण या करोना योद्धांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. संवाद संस्थेच्यावतीने सुनील महाजन यांनी येड्रावकर यांचे स्वागत केले. महावीर जैन विद्यालय आणि विविध सासंकृतिक संस्था, संघटनांनीही राज्यमंत्री येड्रावकर यांच्या सत्कार केला. निकिता मोघे यांनी प्रशांत दामले यांचा तर प्रशांत दामले यांनी दशरथ काळे यांचे स्वागत केले. उल्हास पवार यांचे स्वागत ईटकर यांनी तर प्रवीण तरडे यांचे स्वागत महेश थोरव यांनी केले.
कलावंतांना मानधन द्यायची वेळ आली की शासनाच्यावतीने त्यांची शोधाशोध सुरू होते असे सांगून येड्रावकर म्हणाले, याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा कलावंतांची सूची शासनाकेड नाही. त्यामुळे राज्यातील सर्व कलावंतांच्या नावपत्यासह महितीची सूची सांस्कृतिक खात्याचेवतीने तयार करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ कलावंतांना मानधन वेळेवर मिळण्यासाठीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आमचे प्रय़त्नत सुरू आहेत. त्यामुळे यापुढील काळात मानधन मिळण्यात विलंब होणार नाही. राज्य शासनाच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी महोत्सवांचे आयोजन करून त्यातून निधीही गोळा करून मानधनाचा प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा सुरू आहे. या महोत्सवासाठी कलाकारांनीही शासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कलावंतांशी चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्राच्या अडचणी समजावून घेण्यासाठी दोन महिन्यातून एकदा पुण्यात सर्वांबरोबर बैठक घेण्याचेही येड्रावकर यांनी जाहीर केले.
उल्हास पवार म्हणाले, गुलाबबाई संगमनेरकर या मुद्रा अभिनय, अदाकारी, उत्कृष्ट कथ्थक नृत्य अशा सर्व गुणांनी संपन्न आहेत. त्यांच्या अदाकारील खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली दाद आपण बघितली आहे. तसेच मथुबाई इंदुरीकर यांच्या लावणीला पंडित भीमसेन जोशी यानी दाद दिली आहे. नाटकात प्रथम नटराज पूजन होते तसे तमाशात गणेश पूजन होते. त्यात म्हटलेच आहे की, श्री गणेशा लवकर यावे आतूनी किर्तन वरून तमाशा , त्यामुळे तमाशा म्हणजे एक प्रकारचे किर्तनच आहे हे सूज्ञ, बुद्धीजीवींनी समजवून घेतले तर लोककलावंतांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनच बदलेल.
प्रशांत दामले म्हणाले, आज आम्ही जे सांगतो चंद्रपूरला प्रयोग केला. नांदेडला केला याचे सर्व श्रेय्य गुलाबबाई, मधुवंतीताई यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना आहे. त्यांनी कधीही अडचणी न सांगता, बैलगाडीने प्रवास करून असे त्या परिस्थितीत गावोगावी जाऊन प्रयोग केल्यामुळे तेथील रसिकवर्ग टिकला जो आज आमच्या नाटकाला किंवा तमाशाला किंवा कार्यक्रमाला येतो. या कलावंतांनी त्यांचे झालेले अपमान हे अपमान म्हणून न बघता ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि त्यावर मात केली म्हणून ते आज चाळीस, पन्नास, सत्तर वर्षे टिकून आहेत. हे तरूण कलाकारांनी शिकण्यासारखे आहे. तरडे म्हणाले, रंगभूमी दिनाच्या पूर्व संध्येला या ज्येष्ठ कलावंतांचा गौरव होत असतानाच आम्हा कलाकारांसाठी प्राणवायू (ऑक्सिजन) असलेली थिएटर्स उद्यापासून सुरू होत असल्याने हा कार्यक्रम आगळावेगळा ठरला आहे.
गुलाबबाई संगमनेकर यांच्यावतीने त्यांच्या कन्या वर्षी संगमनेरकर आणि मधुवंती दांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी सांस्कृतिक क्षेत्राच्या अडचणी मांडण्यासाठी किंवा शासानाशी संवाद साधता यावा म्हणून सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांनी पुण्यात संपर्क कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली. कार्यक्रमाची सुरूवात गणेश वंदनाने झाली. मसापचे कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी मानपत्रांच्या वाचनासह कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. महेश थोरवे यांनी आभार मानले.