लोणावळ्यात मुसळधार पावसाचा जोर; राजमाची किल्ल्याकडे जाणारा रस्ता दरडीमुळे बंद

लोणावळा पाऊस
लोणावळा पाऊस

लोणावळा: लोणावळा आणि परिसरात शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘कातळधार’ जवळ शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोठी दरड कोसळली. सुदैवाने, घटना घडली तेव्हा तिथे कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र या दरडीमुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

पर्यटकांची तारांबळ

राजमाची किल्ला परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना या घटनेमुळे मोठा फटका बसला. दरड आणि राडारोड्यामुळे रस्ता बंद झाल्याने पर्यटकांना आपली वाहने तिथेच सोडून पायवाटेने लोणावळ्याकडे यावे लागले. काही पर्यटकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनेही रस्त्याच्या विरुद्ध बाजूला अडकून पडली असून, पूर्ण रस्ता मोकळा होईपर्यंत ही वाहने काढता येणार नाहीत.

अधिक वाचा  पुण्यात 1 जूनपासून 'वीकेंड लॉकडाऊन' नाही -राजेश टोपे

युद्धपातळीवर बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच ‘डेला ऍडव्हेंचर क्लब’च्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम दुपारी दीड वाजल्यापासून सुरू करण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत माती आणि दगड बाजूला करत पायी चालण्यासाठी एक छोटी वाट तयार करण्यात आली आहे. यामुळे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे माघारी येणे शक्य झाले आहे. मात्र, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत होण्यास किमान एक दिवस लागेल, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. राजमाची परिसराचा भाग दुर्गम आणि जंगलव्याप्त असल्याने पावसाळ्यात तिथे जाणे धोकादायक ठरते. प्रशासनाने पर्यटकांना ताकीद दिली असून, रविवारी या किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेत दुर्गम ठिकाणी जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर : विरोधकांचा आरोपांना मोहोळ यांचे सडेतोड उत्तर

लोणावळा शहरात शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांत १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३० जूनपासून येथे पावसाची संततधार सुरू असून, शुक्रवारी २४ तासांत १२१ मिमी पाऊस झाला होता. हवामान विभागाने पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने, नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love