‘शहरातील सिमेंटची जंगले आणि यांत्रिक जीवनशैलीची आता भीती वाटते’; नाना पाटेकर यांची खंत

nana patekar
nana patekar

पुणे(प्रतिनिधी)-“आजच्या धावपळीच्या आणि रखरखत्या जगाने आपल्यातील संवेदनशीलता आणि हळवेपणा हिरावून घेतला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आता मला शहरातील ही सिमेंटची जंगले, टोलेजंग इमारती आणि मोठाल्या गाड्यांची भीती वाटू लागली आहे,” अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. शहरांमधील वाढती गर्दी आणि यांत्रिक जीवनशैलीमुळे माणसांमधील माणुसकी कमी होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक अनंत सामंत यांच्या ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध कवी संदीप खरे, अभिनेत्री नेहा जोशी, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी आणि समन्वयक पंकज क्षेमकल्याणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात: कुंडमाळा पूल दुर्घटनेने प्रशासकीय निष्काळजीपणा चव्हाट्यावर!

नाना पाटेकर म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या कुशीत वावरत असल्यामुळे शहरात पुन्हा येण्याची ओढ उरलेली नाही. उलट, शहरात वावरताना आता भीती वाटते, ही जाणीव अत्यंत वेदनादायक आहे. लेखक अनंत सामंत यांच्या लेखनाबद्दल गौरव काढताना नाना म्हणाले की, सामंत हे वाचकाला पूर्णपणे झपाटून टाकणारे लेखक आहेत. त्यांच्या साहित्यातील निसर्गाची रूपे ही कल्पनाशक्तीच्या पलीकडची असतात. सामंत यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेले वैयक्तिक अनुभव हीच त्यांच्या लेखनाची खरी जमेची बाजू आहे.

याप्रसंगी कवी संदीप खरे यांनीही अनंत सामंत यांच्या लेखनावर भाष्य केले. सामंत यांच्या लेखनात वास्तव जीवनाला समृद्ध करणारी संवेदनशीलता आणि वैश्विकतेचा गाभा असल्याचे त्यांनी नमूद केले. कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ‘एम टी आयवा मारू’ सारख्या अजरामर कलाकृतीमुळे सामंत यांचे नाव वाचकांच्या मनात ३७ वर्षांनंतरही कायम आहे आणि नवीन पुस्तकही वाचकांना नक्कीच आवडेल.

अधिक वाचा  कोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संदीप खरे आणि अभिनेत्री नेहा जोशी यांनी ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ या पुस्तकातील काही निवडक भागांचे प्रभावी अभिवाचन केले, ज्याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love