पुणे(प्रतिनिधि)– लोकसभा २०२४ ची निवडणूक हे खरे काम आणि खोटा प्रचार यामध्ये होणार आहे. ही निवडणूक “राष्ट्र प्रथम” विरुद्ध “परिवार प्रथम” यामध्ये होणार आहे. या वेळेचा संग्राम हा देशाला एकसंध मानणारे विरुद्ध देशाचे उत्तर – दक्षिण असा भेद मानणारे यांमध्ये आहे, असे सांगत भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखालील एनडीए आघाडी प्रचंड जन-समर्थन मिळवून देशामध्ये सगळ्यात मोठे बहुमत घेऊन निवडून येईल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
ते पुण्यामध्ये आयोजिट पत्रकार परिषदेत बोलत होते. जावडेकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास त्यांनी दहा वर्षात करून दाखवलेलं काम, जगामध्ये भारताची वाढलेली प्रतिष्ठा, देशाची झालेली आर्थिक प्रगती, देशामध्ये गरीब कल्याण योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचा पहिल्यांदीच आलेला अनुभव आणि सर्वस्पर्शी झालेला विकास याच्यामुळे हा विश्वास मोदीजींनी मिळवला आहे. २०१४ साली भारताची ख्याती एक जर्जर अर्थव्यवस्था अशी होती आता ती पहिल्या ५ मजबूत अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाते.
याबरोबर रस्ते, रेल्वे, बंदर, जलमार्ग, विमान वाहतूक अशा सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये फार मोठे बदल लोकांना अनुभवायला मिळाले. गरिबांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी ज्या पद्धतीने असंख्य समाज कल्याण योजना मोदी सरकारने यशस्वी व प्रभावीपणे पार पाडल्या, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या, या सर्वाचा जनतेच्या मनावर खोल परिणाम झाला आहे. जनतेच्या खात्यामध्ये थेट दिल्लीहून रक्कम जमा होत असल्यामुळे, कोणतीही गळती त्यात नाही, हा सुद्धा लोकांना पहिल्यांदाच अनुभव येत आहे.
डिजिटल इंडियाची प्रगती ही जगाला आश्चर्यकारक वाटावी अशी आहे. आज आपले UPI APP हे सर्वोत्कृष्ट पेमेंट गेटवे आहे. फोनवरूनच सर्व व्यवहार करण्याची क्षमता हे भारताचे नवे वैशिष्ट्य तयार झाले आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या डेटा हा जगातील सर्वात स्वस्त आहे.
३५ कोटी युवक आणि महिलांना दिलेल्या मुद्रा लोनमुळे २० कोटीहून अधिक रोजगार तयार झाले आहेत.नव्या प्रकारचे उद्योग आणि अन्य देशातून आलेल्या गुंतवणुकीमुळे सर्वत्र प्रगतीची पावती मिळत आहे. जनतेला हा फरक रोज अनुभवायला येत आहे.
मोदी गरीबीतून आले आहेत व त्यामुळे त्यांना गरिबांच्या दुःखांची जास्त जाणीव आहे अशी जनतेची धारणा आहे. या साऱ्यातून हा विश्वास निर्माण झाला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला व एनडीएला प्रचंड मोठा विजय हा सुशासन आणि सर्वांगीण प्रगती मुळे मिळणार आहे.
मोदींसाठी ‘देशहित प्रथम’ आहे तर दुर्दैवाने विरोधी आघाडीला ‘परिवार हित प्रथम’ आहे. इंडी आघाडी मध्ये असलेले पक्ष हे घराणेशाहीचे पक्ष आहेत. विरोधी पक्ष हाताश आणि निराश असल्यामुळे आणि त्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांचं सगळं लक्ष एनडीएच्या जागा कमी कशा होतील याकडे लागले आहे. पण हे पक्ष जेवढे प्रयत्न करतील तेवढ्या आमच्या जागा वाढणार आहेत.
यावेळची लढाई सच्चे काम आणि खोटा प्रचार या मधली आहे. खोट्या प्रचाराची सर्वात वाईट पातळी विरोधकांनी वापरली आहे.पण, खोटारडेपणा टिकत नाही, लोकांना तो लक्षात येतो आणि या खोटारडेपणाला लोक चपराक दिल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधकांच्या प्रचाराला हितसंबंधी गट देशातून आणि विदेशातूनही मदत करीत आहेत. एका टूलकिट नुसार त्यांचा हा प्रचार चालू आहे. पण त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.